आमदारांची विधीमंडळात मागणी
बीड/नागपूर (रिपोर्टर): बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीवर विधीमंडळ अधिवेशनामध्ये गेल्या तीन दिवसांपासून आक्रमकपणे चर्चा होत आहे. आज तिसर्या दिवशीही मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात चर्चा होत सदरील प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवण्याबरोबर या प्रकरणाचा तपास एसआयटीपेक्षा सिटींग जजमार्फत करावा, अशा आशयाची मागणी शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांनी विधानसभेत केली.
मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे पडसाद विधीमंडळ अधिवेशनामध्ये गेल्या तीन दिवसांपासून उमटताना दिसून येत आहेत. कालपासून या प्रकरणावर आक्रमकपणे चर्चा होत असून आज सकाळीही बीड आणि परभणी हिंसाचार, गुन्हेगारीप्रकरणी अनेक आमदारांनी आपले मत मांडत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. मस्साजोग प्रकरणात आ. क्षीरसागर, आ. विजयसिंह पंडित, आ. सुनील प्रभू, आ. अमित देशमुख, आ. नाना पटोले याचंयासह अनेक आमदारांनी या प्रकरणी भाष्य करत सभागृहाचे लक्ष आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला. आ. विजयसिंह पंडित यांनी देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना अटक करण्याबरोबर सदरचे प्रकरण हे फास्टट्रॅकमार्फत चालवण्याबाबत अध्यक्षांकडे विनंती केली तर आ. सुनील प्रभू यांनी बीडच्या प्रकरणात कठोर कारवाई होण्याबराबेरच या प्रकरणाची एसआयटी चौकशीपेक्षा सिटींग जजमार्फत चौकशी करा, खर्या गुन्हेगारांना अटक करा, अशी मागणी करत आपातकालीन चर्चेला सुरुवात झाल्यानंतर या तपासाला गती आली. पोलिसांवर कुणाचा दबाव आहे का? तेथील जनतेला निर्भय करायचे असेल तर यातील आरोपींवर कठोर कारवाई व्हायला हवी, असेही प्रभू यांनी म्हटले. आ. अमित देशमुख, नाना पटोले यांनीही हा मुद्दा लावून धरला.