बीड (रिपोर्टर): बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था पुर्णपणे ढासळल्याने त्याचे पडसाद राज्य आणि केंद्राच्या अधिवेशनात उमटल्यानंतर काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ यांची तडकाफडकी बदली केली. त्यांच्याऐवजी संभाजीनगरचे उपायुक्त नवनीत कांवत यांची बीडसाठी एसपी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कांवत हे राजस्थानमधील शहाजानपूरचे आहेत.
बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी आणि माफियागिरी वाढली. खून, दरोडे, बलात्कार यासह वाळू, गुटखा, दारूची अवैध तस्करी सर्रासपणे होते. यातून गंभीर घटना घडताना दिसून येतात. गेल्या आठ दिवसांपूर्वी मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. त्याचे तीव्र पडसाद राज्य आणि केंद्राच्या अधिवेशनात पडले. काल मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हा पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ यांची तडकाफडकी बदली केली. त्यांच्या जागी संभाजीनगरचे उपायुक्त नवनीत कांवत यांची बीड एसपी म्हणून नियुक्ती केली असून नवनीत कांवत हे 2019 बॅचचे आहेत.