बीड (रिपोर्टर): पंतप्रधान घरकुल योजनेअंतर्गत ज्या लोकांची नावे डिलीट झालेली आहेत अशा लाभार्थ्यांचाही आता विचार केला जाणार आहे. यासाठी घरकुल विभागाकडून नवीन सर्वे करण्यात येणार आहे. या सर्वेची जबाबदारी ग्रामसेवकावर टाकण्यात आली आहे. सर्वेच्या संदर्भात ग्रामसेवकांना आज प्रशिक्षण देण्यात येत आहे. हे प्रशिक्षण बीड तालुक्यातील ग्रामसेवकांसाठी आहे.
गेल्या काही महिन्यांपूर्वी पंतप्रधान घरकुल आवास योजनेअंतर्गत असलेल्या काही लाभार्थ्यांची नावे डिलीट झाली आहेत, ही नावे कशी डिलीट झाली? आणि का झाली? या बाबत गावपातळीवर प्रश्न उपस्थित होत आहेत. ग्रामविकास विभागाच्या वतीने पात्र लाभार्थ्यांना पहिला हप्ता नुकतेच अदा करण्यात आला. टप्प्या टप्प्याने या लाभार्थ्यांना त्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात येणार आहेत. यापूर्वी डिलीट झालेल्या लाभार्थ्यांचा देखील विचार करण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यासाठी आता नवीन सर्वे करण्यात येणार आहे. या सर्वेची जबाबदारी ग्रामसेवकांवर टाकण्यात आली आहे. सर्वे कसा करायचा याबाबतचे प्रशिक्षण बीड पंचायत समितीमध्ये ग्रामसेवकांना देण्यात येत आहे.
सर्वेसाठी कोणीही पैसे देऊ नये
गावपातळीवर अनेक चुकीच्या गोष्टी घडत असतात. लोकांची दिशाभूल करून काही कर्मचारी व लोकप्रतिनिधी सर्वसामान्यांकडून पैसे उकळत असतात. शासनाच्या वतीने सर्वे होत असून याला एक रुपयाही लागत नाही. जो कर्मचारी किंवा गावातील सरपंच पैसे मागत असेल तर याची तक्रार बीड पंचायत समितीकडे करण्यात यावी, असे आवाहन पंचायत समितीचे बीडीओ वानखेडे यांनी केले आहे.