बीड, (रिपोर्टर) ः राज्यामध्ये शेतकरी आत्महत्या मोठया प्रमाणात होऊ लागल्या. या आत्महत्या गेल्या काही वर्षांपासून होत आहे. नापिकी, कर्जबाजारीपणा, सावकारकीचा फास, शेतीमालाला नसणारा भाव यासह इतर कारणामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत जात आहे. शेवटी नैराश्येतून तो स्वतःचे जीवन संपवतो. राज्यात रोज 6 ते 7 शेतकरी आत्महत्या करतात. 24 वर्षांचा कालावधी बघितला तर या 24 वर्षात बीड जिल्ह्यातील 3 हजार 170 शेतकर्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. आजही मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या बीड जिल्ह्यामध्ये होत असल्याचे दिसून येत आहे.
शेती दिवसेंदिवस संकटात सापडू लागली. शेतकर्यांना चांगले दिवस आणण्याच्या वल्गना हवेत विरल्या. कोणत्याही पक्षाचे सरकार आलं तरी शेतकर्याची परेशानी दूर होत नाही. शेतकरी कर्जापासून मुक्त होत नाही. आजपर्यंत अनेकवेळा कर्जमुक्तीचा निर्णय घेण्यात आला. मात्र, त्याचा इतका फायदा झाला नाही. मुळात शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकर्याचं आर्थिक गणित बिघडू लागलं. बँकांचे कर्ज, सावकारकीचा फास, निसर्गाचा लहरीपणा, शेतीमालाला नसणारा भाव, वाढती महागाई यासह इतर चक्रव्यूहामध्ये शेतकरी अडकत चालला. कर्जबाजारी झाल्यानंतर शेतकर्यांमध्ये नैराश्य येते यातून तो स्वतःचे जीवन संपवत आहे. गेल्या काही वर्षांपासून शेतकरी आत्महत्या होऊ लागल्या. त्यावर केंद्र आणि राज्य सरकारकडून कुठल्याही ठोस योजना आखल्या गेल्या नाहीत. नुसत्या आश्वासनाच्या शिळ्या बाता मारण्याचे काम राज्यकर्ते करत आले आहेत. 24 वर्षामध्ये बीड जिल्ह्यात 3 हजार 170 शेतकर्यांनी आत्महत्या केल्याची नोंद सरकार दरबारी करण्यात आलेली आहे.