सोमवारी रात्री नागपुरात जोरदार राडा झाला, औरंगजेबच्या कबरीच्या वादातून हा राडा झाला. दोन गट आमने-सामने आले. त्यानंतर दगडफेक झाली, जाळपोळीच्या घटना घडल्या. या घटनेत मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान या प्रकरणाचा मास्टरमाइंड हा मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टी (एमडीपी) शहराध्यक्ष फहीम खान असल्याचं पोलीस तपासातून समोर आलं आहे. त्यानंतर फहीम खान याच्यासह 50 जणांवर पोलिसांनी देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. त्याला अटक देखील करण्यात आली आहे. फहीम खानवर नागपुरात जमाव जमावल्याचा आरोप आहे. दरम्यान फहीम खानचा आता आणखी एक कारनामा समोर आला आहे.
नागपूर दंगलीचा मास्टरमाइंड असलेल्या फईम खान याने पाच महिन्यांपूर्वी मालेगाव शहरात मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीचं कार्यालयल सुरू केलं होतं. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी त्याने हे कार्यालय सुरू केलं होतं. मात्र त्याने हे कार्यालय चक्क मालेगाव शहरातील महापालिकेच्या घरकुल योजनेतील एका इमारतीमध्ये सुरू केल्याचं आता समोर आलं आहे. त्याने मालेगावात अध्यक्ष व इतर पदाधिकाऱ्यांची देखील नेमणूक केली होती. त्याच्या पक्षानं विधानसभा निवडणुकीमध्ये मोहम्मद फरान यांना उमेदवारी दिली होती. त्यांना या निवडणुकीमध्ये 597 मते मिळाली होती.मात्र निवडणूक होताच पक्ष आणि पक्षाचे कार्यकर्ते गायब झाले आहेत. दरम्यान महापालिकेच्या घरकुल योजनेतील एका इमारतीमध्ये त्याने कार्यालय सुरू केल्याचं समोर आलं त्यानंतर आता नागपूर दंगलीचा मास्टरमाईंड असलेल्या फईम खानचं मालेगावात अजून काही कनेक्शन व संबंध आहेत काय? याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.