चार दिवसापुर्वी गावातून शेळ्या गेल्या होत्या चोरीस
बीड, (रिपोर्टर)ः-तालुक्यातील पिंपळगाव मांजरा येथील अनिरूद्र हरिचंद्र खांडे यांच्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने घरामध्ये प्रवेश करत आतमधील कपाट उघडून आतमधील साडेचार तोळे सोने व नगदी 40 हजार रूपये असा एकूण दोन ते अडीच लाखांचा ऐवज चोरून नेला. सदरची चोरीही काल 31 मार्च 2025 रोजी भरदुपारी घडल्याने गावात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. पाच दिवसापुर्वी याच गावातील गोठ्यातील चोर शेळ्या इरर्टिगा गाडीत टाकून चोरट्याने चोरून नेल्या होत्या. या प्रकरणी पिंपळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक असे की, बीड तालुक्यातील पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या पिंपळगाव मांजरा या छोट्याश्यागावात गेल्या आठ दिवसापासून चोरीच्या घटना सातत्याने घडत आहेत. 26 मार्च रोजी मध्यरात्री दोन ते तीन वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी राजेंद्र लहु खांडे यांच्या गोठ्यातून चोर शेळ्या इरर्टिगा वाहनात चोरून नेल्या. या प्रकरणी पिंपळनेर पोलिसामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरच्या चोरीच्या घटनेचा तपास अद्याप लागलेला नसतांनाच काल दुपारी 12.30 ते 1.00 वाजण्याच्या सुमारास पिंपळगाव येथील अनिरूद्र हरिचंद्र खांडे यांच्या घराला अज्ञात चोरट्याने लक्ष केले. घराचे कुलूप तोडून घरामध्ये प्रवेश केला. आतील कपाटाचे कुलूप डुप्लीकेट चावीने उघडून कपाटातील साडेचार तोळे सोने व नगदी 40 हजार असा एकूण दोन अडीच लाखांचा ऐवज चोरट्यांने चोरून नेला या प्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गावात सातत्याने चोरीच्या घटना घडत असल्याने परिसरामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.