आरोपांची राळ उठवणार्या बडतर्फ झडख कासलेचा अजून एक कारनामा उघड
अंबाजोगाई (जि. बीड) : विविध पोलिस अधिकारी आणि राजकीय नेते यांच्यावर गंभीर आरोपांची राळ उठवून वादग्रस्त ठरलेल्या बडतर्फ पीएसआय रणजीत कासलेचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. कासले याने मैत्रीचा गैरफायदा घेत तब्बल सहा लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप अंबाजोगाई येथील व्यावसायिक सुधीर छगनराव चौधरी यांनी केला आहे. याप्रकरणी अंबाजोगाई शहर ठाण्यात कासले याच्यावर फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
सुधीर चौधरी हे अंबाजोगाई येथे कुणाल इंटरप्रायजेस नावाने एनर्जी ड्रिंकची एजन्सी चालवतात. चौधरी यांच्या तक्रारीनुसार, एप्रिल 2024मध्ये कासले याने आईची प्रकृती खालावल्याचा बनाव रचून चौधरी यांच्याकडून प्रथम विविध फोन पे नंबरवरून एक लाख रुपये घेतले. यानंतर 15 एप्रिल रोजी दवाखान्याच्या खर्चासाठी रोख रक्कम लागल्याचे सांगून रेस्ट हाऊस, अंबाजोगाई येथे भेट घेऊन पाच लाख रुपये कॅश स्वरुपात घेतले. हे पैसे चौधरी यांनी आपल्या वडिलांच्या खात्यातून काढून दिले होते. त्यानंतर अनेकदा मागणी करूनही कासले याने पैसे परत केले नाहीत. माझी गाडी खासगी सावकाराकडे ठेवून मला व्याजावर पैसे मिळवून दे आणि आपला व्यवहार संपवू, असा सल्ला देत त्याने फसवणुकीची परिसीमा गाठली. त्यानंतरही त्याने प्लॉट विकून पैसे देतो, असा पुन्हा वेळकाढूपणा केला. अखेर चौधरी यांनी अंबाजोगाई शहर ठाण्यात कासलेच्या विरोधात तक्रार दिली. बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक रणजीत कासले हे स्वतःच्या खात्यावर दहा लाख रुपये धनंजय मुंडे यांच्या माणसांनी पाठवले, असे सांगत होते.