बीड पोलिसांची धडक कारवाई
टोळीतले पाच जण पोलिसांच्या ताब्यात; अन्य दोन फरार
बीड (रिपोर्टर): बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हा पोलीस अधिक्षक शर्थीचे प्रयत्न करत आहेत. जिल्ह्यातील गुन्हेगारीचे व गुंडगिरीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी त्यांच्यावर कठोर कारवाया केल्या जात आहेत. परळी, अंबाजोगाई तालुक्यात दहशत निर्माण करणार्या व विविध गुन्हे असलेल्या गुन्हेगारांच्या टाळीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या टोळीतले पाच जण पोलिसांच्या ताब्यात आहेत तर अन्य दोघे अद्यापही फरार आहेत. मोक्काअंतर्गत कारवाई केल्यानंतर या भागातल्या गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांत धडकी भरली आहे.
बीड जिल्हयातील कायदा आणि सुव्यवस्था अबादित राखण्यासाठी बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. नवनीत कॉवत यांनी शर्थीचे प्रयत्न चालवले आहेत. बीड जिल्हयातील गुन्हेगारीचे व गुंडगिरीचे समुळ उच्चाटन करण्याचा उदात्त दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवुन मकोका व एमपीडीए व कलम 55,56,57 मपोका अन्वये बर्याच गुन्हेगारांवर व गुंडावर कार्यवाही करण्याचा धडाका बीड जिल्हाचे पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली बीड पोलीसांनी सुरु ठेवला आहे. जनतेच्या जिविताचे व मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी जिल्हयात चोर्या, दरोडे, घरफोड्या, खुन, खुनाचा प्रयत्न, दरोडयाची तयारी, बलात्कार, जुलुमाने घेणे, पळवून नेणे, खंडणी मागणे या व अशा गंभीर स्वरुपाचे गुन्हे करणार्या गुन्हेगारांविरुध्द ठोस कारवाई करण्यासाठी बीड जिल्हयातील पोलीस जिल्हयातील व जिल्हाचे बाहेरील गुन्हेगांरावर करडी नजर ठेऊन आहेत.
परळी तालुक्यातल्या तडोळ येथील सहदेव वाल्मिक सादभाई यांची मोटारसायकल अडवून त्यांच्यावर रघुनाथ फड सह अन्य सात ते आठ जणांनी हल्ला चढवून जिवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण करत खिशातले 2 लाख 70 हजार रुपये बळजबरीने काढून ते फरार झाले होते. रघुनाथ फड याच्या सह जन्नाथ विक्रम फड, सुदीप रावसाहेब सोनवणे, बालाजी अंकुश दहीफळे आणि विलास बालाजी गिते या पाच जणांनी पोलिसांनी जेरबंद केले तर अन्य दोघे जण फरार आहेत. फड याच्या टोळीने परळी शहर, संभाजीनगर व अंबाजोगाई ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत धुमाकूळ घातलेला होता. या टोळीविरोधात दहा गुन्हे केल्याचे उघड असून यात खुनाचा प्रयत्न, दुखापत करणे, दंगा करणे, कट रचने, अवैध शस्त्र बाळगणे, जबरी चोरी, दरोडा, वाटमारी, मारहाण, सरकारी कामात अडथळे यासारखे गंभीर गुन्हे आहेत. म्हणून या टोळीविरोदात जिल्हा पोलीस अधिक्षक नवनीत काँवत यांनी मकोका अंतर्गत कारवाई करण्याचा निर्णय घेत तो प्रस्ताव विशेष पोलीस महानिरीक्षक यांना पाठवण्यात आला आहे.