बीड (रिपोर्टर) तालुक्यातील वडवाडी येथे सशस्त्र दरोडा टाकण्यात आला होता. या प्रकरणी दोन दरोडेखोरांच्या काल पोलिसांनी मुसक्या बांधल्या होत्या. रात्री पुन्हा मोठ्या शिताफीने बीड पोलिसांनी हैद्राबादेत सर्च ऑपरेशन राबवून राजेंद्र रमेश शिंदे (रा. कोकणी, कळंब), रामा ऊर्फ दादा काळे (रा. केवड ता. केज) या दोन जणांच्या मुसक्या बांधल्या. काल पकडलेल्या दरोडेखोरांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
वडवाडी येथील बळीराजा कृषी विज्ञान केंद्रात 4 ऑगस्ट रोजी दहा दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकत लाखोंची लूट केली होती. या प्रकरणी नेकनूर पोलिसात गुन्हा दाखल आहे. काल पोलिसांनी दोन दरोडेखोरांच्या मुसक्या बांधल्या होत्या. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी इतर साथीदारांची काही नावे सांगितली आहेत. त्यावरून रात्री स्थानिक गुन्हे शाखेचे पीएसआय भगतसिंह दुल्लत यांनी हैद्राबाद येथे आपल्या टीमसह सर्च ऑपरेशन राबवून दोन कुख्यात दरोडेखोरांच्या मुसक्या बांधल्या. त्यांना बीडकडे पोलीस घेऊन येत आहेत. ही कारवाई पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलीस अधिक्षक सुनिल लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पीएसआय भगतसिंह दुल्लत आणि त्यांच्या कर्मचार्यांनी केली. तर काल ताब्यात घेतलेल्या दोन दरोडेखोरांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून याचा पुढील तपास नेकनूर पोलीस करत आहेत.