गेवराई (रिपोर्टर) तालुक्यातील उमापूर रोडवरील तळण्याचीवाडी येथे दोन गटात दि.12 ऑगस्ट रोजी तुंबळ हाणामार्या झाल्या होत्या या घटनेत नामदेव ढेंबरे ( वय 32 ) हा तरुण गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर औरंगाबाद येथे उपचार सुरू होते. दरम्यान काल दि.16 मंगळवार रोजी दुपारी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यानंतर मारहाण केलेल्या लोकांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी गावातील शोकडो तरुणांनी नामदेव यांचा मृतदेहासह रुग्णवाहिका घेऊन थेट गेवराई पोलीस ठाण्यात आणून संबंधित लोकांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.
यानंतर रात्री उशिरा याप्रकरणी पाच आरोपींच्या विरोधात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहेत.
दरम्यान एवढी गंभीर घटना घडूनही उशिरापर्यंत पोलिस गुन्हा नोंद करत नसल्यामुळे गेवराई पोलीस स्टेशन परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक जंवजाळ व पीएसआय बोडखे यांनी तरुणांची समजूत काढत पुढील कारवाई सुरु केली व यानंतर रात्री उशिरा या मारहाण प्रकरणातील पाच आरोपीं विरोधात कलम 302 नुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक बोडखे हे करत आहेत. तर गेवराई पोलीस ठाण्याअंतर्गत सुरू असलेल्या गुन्हेगारी काही केल्या कमी होत नसल्याने पोलिसांप्रति नागरिकांचा अविश्वास वाढत असून ठाणे प्रमुख रवींद्र पेरगुलवार यांच्या विरोधात प्रचंड रोष निर्माण होत आहे.
गेवराईत चोर्या, खून, दरोडा मारामारी सारख्या गंभीर गुन्ह्यात वाढ ; ठाणे प्रमुख दलालांच्या गराड्यात
गेवराई शहरासह पोलीस ठाणे अंतर्गत रोजच्या रोज काही न काही घटना सुरूच असून गुन्हेगारीत वाढ होत आहे. गेल्या आठ दिवसात तीन ते चार ठिकाणी जबरी चोरीच्या घटना ताज्या असतानाच दि. 12 रोजी तळणेवाडी दोन गटात झालेल्या मारहाण प्रकरणातील जखमीचा मृत्यू झाला असून एकाच महिन्यातील खुनाची ही दुसरी घटना असून ठाणे प्रमुख मात्र दलालांच्या गराड्यातून बाहेर यायला तयार नसल्यानेच असे गंभीर गुन्ह्यात वाढ होत असल्याचे बोलले जाते. गेल्या अनेक दिवसांपासून चोर्याचे सत्र सुरूच असून गुन्हेगारीच्याही अनेक घटना घडत आहेत. दरम्यान गुन्हेगारीच्या प्रमाणात एवढी वाढ झाली असताना ठाणे प्रमुख हे कायम दलालांच्या गराड्यातच असल्याचे दिसून येत आसल्याने त्यांच्या विरोधात नागरिकांमधून प्रचंड रोष निर्माण झाल्याचे दिसून येत आसून या प्रकरणी वरिष्ठांनी लक्ष घालण्याची गरज आहे.