विधीमंडळाच्या पायर्यांवर आज महाराष्ट्राच्या संस्कार आणि संस्कृतीचे वस्त्रहरण झाले. मग ते सत्तेतले असो की विरोधी बाकावरले, या दोघांनाही माज, मस्ती आल्याचे पाहून उपस्थित लोकप्रतिनिधींनी महाराष्ट्र धर्माची गच्छंती केली. विधीमंडळात आज जो काही राडा झाला तो संतापजनक होता. महाराष्ट्र अनेक संकटात अडकलेला आहे. इथला शेतकरी बेरोजगार, कष्टकरी आणि सर्वसामान्य पिचलेला आहे. त्यांचे प्रश्न सोडवण्यापेक्षा खोके आणि बोक्यात अडकलेल्या लोकप्रतिनिधींनी आज जो नागवेपणा उभ्या महाराष्ट्राला नव्हे तर उभ्या देशाला दाखवून दिला. तो निषेधार्थ म्हणावा लागेल. खरे पाहिले तर इथे अनैसर्गिक पध्दतीने स्थापन झालेल्या सत्ताधार्यांनी संस्कृतीचे दर्शन दाखवून द्यायला हवे होते. मात्र हेच सत्ताधारी जेव्हा अंगावर आले तर शिंगावर घेवू, अभी पिक्चर बाकी है, ते काय आम्हाला धक्काबुक्की करतात, आम्हीच त्यांना धक्काबुक्की केली अशी जाहिर कबुली देत महाराष्ट्रात आता शिंदे-फडणवीसांचे नव्हे तर माफियांचे राज्य आहे अशी सरळ सरळ ओळख उभ्या हिंदुस्थानाला देत जो काही माजमहिना दाखवून दिला तो तळपायाची आग मस्तकाला नेणारा होता. आज जेव्हा विधीमंडळातले थेट प्रक्षेपण महाराष्ट्र आणि देश पाहत होता तेव्हा माज, मस्ती, संस्काराची गच्छंती अशा प्रतिक्रिया येत असतानाच अधिवेशनात भाद्रपदाचा महिना दिसून येत होता. कामातुरा भय ना लज्जाचे दर्शन देत लोकप्रतिनिधींनी जो धिंगाणा घातला तो निषेधार्य.
अखंड हिंदुस्थानातल्या कुठल्याही राज्यात जे घडले नसेल ते महाराष्ट्रात घडतंय. अखंड देशाला संस्कार आणि संस्कृतीचे धडे देणार्या शिवबांच्या महाराष्ट्रात सत्तेत कामातूर झालेले लोकप्रतिनिधी मस्तीत वागतायत. शाहु,फुले, आंबेडकरांच्या विचारांना हारताळ फासतायत, महाराष्ट्राच्या संस्कार आणि संस्कृतीला नागवे करून वेशीला टांगतायत, जो महाराष्ट्र कधीकाळी उभ्या महाराष्ट्राला राजकीय धडे द्यायचा त्या महाराष्ट्रावर आजकालच्या तथाकथीत लोकप्रतिनिधींच्या वर्तवणुकीमुळे राजकारण शिकण्याची वेळ आलीय. एक तर गेल्या तीन वर्षाच्या कालखंडात महाराष्ट्रात जे राजकीय नाट्य घडून आले, ते अन्य कुठल्या राज्यात आले नसेल. तीन वर्षाच्या कालखंडामध्ये
राज्यात तीनदा सरकार स्थापन
झाले. युती करून लढलेले निवडूण येताच मुख्यमंत्री पदाच्या सिंहासनापायी विखरून गेले. सत्तेचा लोभ असलेल्या भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांना रात्रीतून आपलंसं करत पहाटेच देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री तर अजित पवारांना उपमुख्यमंत्री म्हणून शपथ दिली. राज्यपाल असणारे भगतसिंह कोश्यारी हे ही गेल्या तीन वर्षाच्या कालखंडात संविधानावर अक्षरश: बलात्कार स्वरूप छेडछाड करू पाहताना उघड दिसते. फडणवीस-पवारांचे सरकार राष्ट्रवादीचे सर्वासर्वे खा.शरद पवारांच्या निर्णायक भूमिकेमुळे अवघ्या आठ दहा तासात कोसळले. अन पुन्हा कधीही वैचारिक बांधिलकी नसलेले शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे सरकार महाराष्ट्रात स्थापन झाले. अडिच वर्षाचा कालखंड महाविकास आघाडी सरकार म्हणून उध्दव ठाकरेंच्या नेतृत्वात राज्यात सरकार चालवून काढण्यात आला. मात्र सत्ता हेच सर्वस्व मानणार्या आणि राज्यपातळीवरील स्थानिक छोट्या मोठ्या पक्षांचे पंख छाटणार्या भाजपाने गेली 25 वर्षे ज्याच्यासोबत मैत्री होती, ज्याचे कुंकू कमळाबाई आपल्या माथी लावायचे त्याच शिवसेनेला खत्म करण्याइरादे शिवसेनेचे 50 शिलेदार फोडले अन एकनाथ शिंदे या बंडखोर शिवसैनिकाला मुख्यमंत्री करून महाराष्ट्रात भाजपाने स्वत:ची सत्ता स्थापन केली. हे सर्व तीन सरकारचे केंद्र हे सुसंस्कृत महाराष्ट्र होते हे विशेष. सत्तेसाठी आम्ही कुठल्याही स्तराला जावू शकतो. लोकमताचा आदर करणे हे आमच्या संस्कृतीत बसत नाही. आम्हाला सत्तेची वासना आहे., मोह आहे हे भाजपानेच नव्हे तर प्रत्येक पक्षाने दाखवून दिले. महाराष्ट्रात घडलेल्या या तीन वर्षातील स्वार्थी घडामोडीतून महाराष्ट्राला काय मिळाले? महाराष्ट्रातील जनतेला काय देण्यात आले? शेतकर्यांचे प्रश्न सुटले का? त्यांच्या आत्महत्या कमी झाल्या का? बेरोजगारांच्या हाताला काम मिळाले का? शिक्षणाचे धु्रवीकरण बंद झाले का? आरोग्याचे प्रश्न सुटले का? पाणीप्रश्नाचे काय? पावसामुळे उध्वस्त झालेल्या पिकांचे काय? राज्यात वाढलेल्या महागाईवर तोडगा काढला का? असे एक ना अनेक प्रश्न प्रामुख्याने उपस्थित असताना आणि शेतकरी थेट अधिवेशनस्थळी स्वत:ला पेटवून घेत असताना सत्ताधारी आणि विरोधी लोकप्रतिनिधी काय करतात? अधिवेशनामध्ये लोकांच्या प्रश्नावर चर्चा होते की स्वत:चा इगो पाळण्याहेतू अधिवेशनात माफियागिरी सुरू आहे हे कळायला मार्ग नाही.
मुख्यमंत्र्याकडून धमकीची भाषा
जेव्हा येते तेव्हा महाराष्ट्र कुठल्या दिशेने जातोय आणि अधिवेशनाचा शेवट काय होईल? याचा अंदाज नक्कीच बांधता येतो. राज्यात गेल्या दिड दोन महिन्यापूर्वी स्थापन झालेल्या बंडखोर शिंदे-फडणवीस सरकारचे पहिले पावसाळी अधिवेशन गेल्या पाच दिवसापासून मुंबईत सुरू आहे. विरोधकांनी आपल्या अधिकारानुसार पारंपारिक पध्दतीने विधीमंडळाच्या पायर्यांवर ‘पन्नास खोके, एकदम ओके’ ‘ताट वाटी, चलो गुवाहाटी’ यासह अन्य घोषणा देत बंडखोर शिवसेना आमदारांना खिजवले. शेतकर्यांच्या प्रश्नावर, बेरोजगारांच्या प्रश्नावर, विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर पोटतिडकीने रोज आंदोलन केले. हे आंदोलन विरोधकांचा अधिकार असला तरी वैयक्तीत पातळीवर खिजवण्याचा हेतू निश्चित मानला जातो. परंतू इथे विचाराने आणि वैचारिकतेने विरोध करणे अपेक्षीत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कधी धनंजय मुंडेंना धमकी देतात तर कधी सभागृहातील अखंड आमदारांना चिट्टेबिट्टे काढण्याची धमकी देवून आवाज दाबण्याचा प्रयत्न करतात. धनंजय मुंडे पायर्यांवर आक्रमकपणे घोषणाबाजी करतात म्हणून मुख्यमंत्री शिंदे थेट सभागृहात मुंडेंना तुमची कारकिर्द माहित आहे. फडणवीसांनी दया, करूणा दाखवली यापुढे तशी दाखवता येणार नाही. असा सज्जड दम देतात. तर काल सरळ सरळ अजित पवारांपासून ते विरोधी बाकावरील सर्वच आमदारांना उद्देशून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरळ सरळ तुमच्या सर्वांचे चिट्टेबट्टे आमच्याकडे आहेत असा धमकीवजा इशारा देवून विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा सुसंस्कृत महाराष्ट्राच्या राजकीय पटलाचे आणि निधड्या सह्याद्रीचे नेतृत्व असंवेदनशील आणि असहनशील व्यक्तीकडे आहे का? हा सवाल उपस्थित होतो. यापुढे जात आज विधींडळाच्या पायर्यावर जो सत्ताधारी आणि विरोधकांचा धिंगाणा झाला तो लांचनास्पद आहे. महाराष्ट्रात कधीही घडले नाही असे आज विधीमंडळ पायर्यांवर घडले. आणि
सत्ताधारी विरोधक भिडले.
अक्षरश: सत्ताधारी आणि विरोधी आमदारांमध्ये मारामारी झाली. धक्काबुक्की झाली. हे महाराष्ट्राला शोभणारे नाही. आजपर्यंतचा इतिहास असा आहे, जो विरोधी बाकावर आहे तो अधिकाराने विधीमंडळाच्या पायर्यावर आंदोलन करत असतो. करत आला आहे. गेल्या चार दिवसाच्या कालखंडात राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेना आमदारांनी पायर्यांवर आंदोलन केले. बंडखोर शिवसेना आमदारांना खिजवले. मात्र आज प्रत्यक्षात पायर्यांचा ताबा प्रथमच सत्ताधार्यांनी घेतला. विरोधकांविरोधात घोषणाबाजी सुरू केली. लवासापासून सिंचनापर्यंत खोके आणि बोक्याची घोषणाबाजी शिंदे गट आणि भाजप आमदार करत होते. तर दुसरीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना, काँग्रेस हे आमदार भाजपासह शिंदे गटावर घोषणाबाजीतून तुटून पडले होते. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आणि बंडखोर शिवसेना आमदार महेश शिंदे यांच्यात हमरातुमरी झाली. हि हमरातुमरी धक्काबुक्कीवर गेली. धक्काबुक्कीतून महेश शिंदेंनी अमोल मिटकरींवर थेट हात उगारला. हा धिंगाणा, हा राडा आणि हा सत्ताधार्यांचा नागवेपणा उभ्या महाराष्ट्राने नव्हे तर देशाने पाहिला. खरे तर सत्ताधारी असो किंवा विरोधक, राज्य चालवणार्यांनी सुसंस्कृतपणा ठेवणे अपेक्षीत असते. मात्र इथे ना सत्ताधार्यांकडून ना विरोधकांकडून, कुणाकडूणनही सुशिक्षीतपणा दिसून आला नाही. उलट शिवसेनेतून बंड करून बाहेर पडलेल्या आमदारांच्या
धमक्या आणि इशारे
महाराष्ट्राच्या संस्कृतीला विचार करावयास लावणारे होते. आपण गल्लीमधले टवाळखोर आहोत अशा पध्दतीने थेट वक्तव्य केले जात होते. विधीमंडळाच्या पायर्यावर जे झाले ते शेतकर्यांच्या आत्महत्यासाठी नव्हते. महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी नव्हते, बेरोजगारांचे प्रश्न मिटावेत म्हणून नव्हते, शिक्षण आरोग्य आणि मुलभूत गरजा कशा सोडवाव्या यासाठीही तो धिंगाणा नव्हता. तर तो धिंगाणा होता स्वत:ची अब्रु झाकण्यासाठी हे लोकप्रतिनिधी निव्वळ ‘शेळीच्या शेपटीसारखे’ आम्हाला तर भासले. शेळीची शेपटी माशाही हाणू शकत नाही आणि स्वत:ची अब्रुही झाकू शकत नाही. तेच आज सत्ताधारी बंडखोर शिवसेना आमदारांचे बंडातले कंड दिसून आले. धक्काबुक्की झाल्यानंतर झालेली घटना हि दुर्देवी आहे, अनावधनाने ती झाली असे व्हायला नको होते, माणूस आहोत माणसाकडून चुका होतात असे म्हणणे गोंधळ घालणार्या आमदारांकडून अपेक्षीत होते. मात्र इथे त्या गोंधळाचे समर्थन केले गेले. गोगावले नामक शिवसेनेच्या बंडखोर आमदाराने तर थेट पिक्चर अभी बाकी है असे जाहिर वक्तव्य करून विरोधकांनाच नव्हे तर उभ्या महाराष्ट्राला धमकावले. अंगावर आल्यावर शिंगावर घेण्याची भाषा केली. आम्ही कोणाला सोडत नाही असे म्हणाले. एवढेच नव्हे तर ते काय आम्हाला धक्काबुक्की करताय आम्हीच त्यांना धक्काबुक्की केली अशी जाहिर कबुली दिली. गोगावलेंच्या या वक्तव्यावरून महेश शिंदेंनी अमोल मिटकरींवर उगारलेल्या हातावरून महाराष्ट्राच्या विधीमंडळात शिंदे-फडणवीसांचे माफियाराज चालू आहे का? हा सवाल आता विचारावा लागेल. राज्याच्या राजकारणामध्ये आजपावेत जे झाले नाही ते विधीमंडळाच्या पायर्यावर झाले.
महाराष्ट्राचा इतिहास काय सांगतो?
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर महाराष्ट्रात संस्थाने एकत्रीत करण्यासाठी जे प्रयत्न करावे लागले तो हैद्राबाद मुक्तीसंग्राम असो अथवा महाराष्ट्रामध्ये मुंबईला सामावून घेण्यासाठी केले गेलेले आंदोलन असो, यशवंतराव चव्हाणांपासून ते या तीन वर्षात झालेल्या तीन वेगवेगळ्या मुख्यमंत्र्यांपर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणाचा इतिहास हा देशाच्या राजकारणाला दिशा देणारा ठरत आला आहे. नौकरशाही जेव्हा केव्हा सर्वसामान्यांची अडवणूक करते. बाबु लोक शासनाच्या योजना अडवून धरतात तेव्हा तेव्हा लोकप्रतिनिधींनी सर्वसामान्यांची अडवणूक सोडवण्याहेतू योजना सर्वसामान्यांपर्यंत नेण्यासाठी प्रयत्न करायचे असतात. अधिवेशनाच्या माध्यमातून महाराष्ट्राचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करायचे असतात. सत्ताधारी आणि विरोधकांनी लोकांच्या मुलभूत गरजा, त्याची निकट ओळखून प्रश्न सोडायचे असतात. मात्र अनैसर्गिक युत्यांमधून स्थापन झालेल्या सरकारकडून आणि विरोधकांकडून त्या अपेक्षा नक्कीच फोल म्हणाव्या लागतील कारण आज विधीमंडळाच्या पायर्यावर जे झाले ते संतापजनक झाले. ती माजमस्ती आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीवर गच्छंती होती. आजचा जो प्रकार आहे तो तळपायाची आग मस्तकाला आणि अधिवेशनात निव्वळ भाद्रपदाचा महिना दर्शवणारा म्हणावा लागेल. शेम शेम..