बीड (रिपोर्टर) देश मोठ्या संभ्रमावस्थेतून जात आहे. प्रत्येक क्षेत्रात संभ्रामवस्था सध्याचे सरकार करत आहे. या सरकारला ब्राम्हणी पॉलिसी आनावयाचे आहे. मात्र ते हिंदुत्वाचे नाव पुढे घेवून समाजातील घटकांना सामावून घेण्यासाठी संभ्रम अवस्था निर्माण करत आहे. सरकारच्या सर्व धोरणे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आखत असून ते आमलात आणण्याचे काम मोदी सरकार करत आहे. त्यामुळे देशाला खरा धोका हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघापासून आहे असे प्रतिपादन कॉ.प्रा.डॉ.राम बाहेती यांनी केले.
बीड येथील सामाजिक न्यायभवनाच्या सभागृहामध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे त्रिवार्षिक चोविसावे अधिवेशन सुरू झाले आहे. या सभागृहाला दिवंगत कॉ.एस.वाय.कुलकर्णी सभागृह असे नाव दिले आहे. व्यासपिठावर भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे सरचिटणीस कॉ.नामदेव चव्हाण, अॅड.भिमराव चव्हाण, कॉ.ज्योतीराम हुरकूडे, रंजना टकले आदि मान्यवर उपस्थित होते. डॉ.बाहेती या अधिवेशनात बोलताना पुढे म्हणाले की, देशात वैचारिक गोंधळ निर्माण करून दिशाभूल करण्याचे काम सरकार करत आहे. त्यामुळे समाजातील सर्व नागरिकांनी जागरूक होवून डोळसपणे सरकारच्या कृतीकडे बघीतले पाहिजे. आपण जर डोळस झालो नाही तर पुढील अवस्था फार धोकादायक निर्माण होतील. हिंदुत्व हे नाव घेवून हि संभ्रमावस्था निर्माण करण्याचे काम चालु आहे. छत्रपतींचा खरा भगवा किंवा त्यांची वैचारिक मुल्ये आम्हीच जोपाासत आहोत. हा भगवा तुकोबारायांचा पण आहे. त्यामुळे समाजातील सर्व अठरापगड जातीने सरकारच्या प्रत्येक धोरण कृतीकडे जागरूकतेने बघावे आणि चुकीच्या धोरणाला विरोध करावा. जर असे झाले तरच देश वाचेल. नसता देशाला खरा धोका हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघापासून आहे. असे प्रा.राम बाहेती यांनी सांगितले. याच अधिवेशनात ज्यांनी वयाची 75 वर्षे पूर्ण केले आहेत अशा कॉम्रेड लोकांचाही सत्कारही या अधिवेशनात करण्यात आला. तर अंथरवण पिंप्री येथील ग्रामपंचायत जिंकल्याबद्दल सरपंच प्रभाळे यांचा सत्कार करण्यात आला. हे अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनाच्या प्रवेशद्वाराला दिवंगत कॉ.मनोहर टाकसाळ असे नाव दिले आहे.