बीड (रिपोर्टर) बीड नगरपालिका विकास केल्याचा नुसता डांगोरा पिटत आहे. अनेक प्रभागांमध्ये नागरी सुविधांचा दुष्काळ असून तेलगाव नाका परिसरातील पिण्याच्या पाण्यासह रस्ते व नाल्याचा प्रश्न सोडवण्यात यावा यासाठी आम आदमी पार्टीच्या वतीने नगरपालिका कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता.
तेलगाव नाका परिसरामध्ये वेळेवर पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागते. त्याचबरोबर या भागामध्ये रस्त्याची दुरावस्था आहे. विजेचाही प्रश्न सातत्याने निर्माण होत असतो. नगरपालिका विकास केल्याचा डांगोरा पिटते, तेलगाव नाका परिसर न.प.च्या हद्दीत येत नाही का? असा प्रश्न उपस्थित करत सदरील भागामध्ये नागरी सुविधा पुरवण्यात याव्यात, या मागणीसाठी आम आदमी पार्टीच्या वतीने न.प. कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. या वेळी जिल्हाध्यक्ष अशोक येडे, रामधन जमाले, ज्ञानेश्वर राऊत, सय्यद सादेक, मिलिंद पाळणे, भीमराव कुटे, आझम खान यांच्यासह आदींची उपस्थिती होती.