अजितदादा, मराठवाड्याचं पालकत्व घ्या – आ. प्रकाश सोळंके
बीड (रिपोर्टर)
दादांना मराठवाडा मागासलेला म्हटलं की राग येतो. दादा, शेतीच्या पाण्याबाबत आम्ही मागासलेले आहोत, गोदावरीचं खोरं हे तुटीचं खोरं आहे. ते नैसर्गिक आहे. म्हणून आम्हाला पाणी मिळत नाही. 165 टीएमसी पाणी आम्हाला मिळावं यासाठी प्रयत्न व्हायला हवेत, पंच्याहत्तर वर्षे झाले तरी आमची तहाण भागलेली नाही, आमच्या शेतकर्यांच्या आत्महत्या थांबवायचे असतील तर आम्हाला आमचे पाणी मिळायला पाहिजे, असे आ. प्रकाश सोळंके यांनी म्हटले.
ते माजलगाव येथे आयोजीत राष्ट्रवादीच्या मेळाव्यात बोलत होते. पुढे बोलताना आ. सोळंके म्हणाले की, आर.टी. देशमुखांच्या काळामध्ये माजलगाव तालुक्यातील अनेक प्रकल्प बंद पाडण्याचं काम भाजपानं केलं. लोणी सांगवीसारखी महत्वाकांक्षी योजना बंद पाडण्याचे पाप भाजपाने तेव्हा केले. पुन्हा सत्ता आली तेव्हा हे काम आम्ही सुरू केले, 2023 पर्यंत लोणी सांगवी इथलं पाणी माजलगावच्या प्रकल्पात आणून टाकू असे अनेक बंद केलेले प्रकल्पाची कामे पुन्हा आम्ही सुरू केले. मराठवाडा मुक्तीसंग्रामचा पुर्ण इतिहास आजच्या तरुणांना माहित नाही. या संग्रामात ज्यांनी लढा दिला त्यांची नावेही या तरुणांना माहित नाहीत. हे दुर्दैव आहे. त्यासाठी मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास शसानाच्या वतीने लिहिण्यात यावा, त्यासाठी तुम्ही प्रयत्न करावेत, असे प्रकाश सोळंकेंनी अजितदादांना म्हटले. पश्चिम वाहिन्यांचे वाहत असलेले पाणी मला मिळावे, 165 टीएमसी पाणी आम्हाला मिळाले तर बीड, परभणीसह लातूरला त्याचा मोठा फायदा होईल. अजितदादा तुम्ही आता मराठवाड्याचं पालकत्व घ्या आणि विकासाचा अनुशेष भरून काढा, असेही या वेळी प्रकाश सोळंकेंनी म्हटले.