माजलगाव (रिपोर्टर)
महाविकास आघाडीचे सरकार राज्यात होते तेव्हा मागच्या वर्षी पीक विम्याचे बीड जिल्ह्याला 745 कोटी मिळाले, आता फुटकी कवडी मिळाली नाही, जोपर्यंत जिल्ह्याच्या शेतकर्याला पैस मिळत नाहीत तोपर्यंत आम्ही स्वस्त बसणार नाहीत. भलेही विरोधी पक्षात आहोत परंतु अजितदादांच्या नेतृत्वात सरकारला झुकवू आणि जिल्ह्यातील शेतकर्यांना न्याय मिळवून देऊ, असे उद्गार आ. धनंजय मुंडे यांनी काढले.
ते माजलगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये बोलत होते. पुढे बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की, देशाला स्वातंत्र्य मिळाले 15 ऑगस्टला आणि या मातीतल्या माणसाला 17 सप्टेंबरला. त्या सर्व हुतात्म्यांना अभिवादन करत धनंजय मुंडेंनी हैद्राबाद मुक्ती संग्राम दिनाच्या उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. पुढे बोलताना मुंडेंनी जुनी आठवण सांगत, प्रकाशदादा निवडून आल्यावर मी नाचलो होतो, तो क्षण आजही मला आठवत असल्याचे त्यांनी सांगितले. नव्याने सरकार आले, ते मजेशीर आहे. मला हे लक्षात आले नाही, 120 आमदार असलेल्या भाजपाने काय मिळवले? मुख्यमंत्री तर होता आले नाही, उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानावे लागले, उपमुख्यमंत्री पद हे संविधानिक नसून विरोधी पक्षनेतेपद हे संवैधानिक असल्याचे त्यांनी म्हटले. कोविडमध्ये अजितदादांनी बीड जिल्ह्याला एक रुपयाही कमी पडू दिला नाही, मराठवाड्यात कुठेच नाही असे एक हजार खाटांचे हॉस्पिटल बीडमध्ये उभे करण्यात आले. मराठवाड्यावर दादांचे प्रेम आहे. कोविडने माणसे तर मारलीच परंतु माणुसकीही मारली मात्र अशा भयावह परिस्थितीत महाराष्ट्राच्या मंत्रालयात बसून उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार अवघ्या महाराष्ट्रावर लक्ष देत होते. नवं सरकार
कसं आलं हे सर्वांना माहित आहे. दादा ते सरकार तुम्हालाच घाबरतय. सरकार बेशिस्तीत होतं, परंतु शिस्तीत वागायचं हे दादांनीच शिकवलं. सरकारच्या स्थापनेचा इत्यंभूत आढावा देत सरकारला आजपर्यंत जिल्ह्या जिल्ह्याला पालकमंत्री देता आलं नाही हे दुर्भाग्य असल्याचे सांगून तुमचा आमचा विकास कसा होईल. खरंतर या सरकारच्या कार्यप्रणालीचा हिशोब शुन्याची निर्मिती करणार्यालाही लावता येणार नाही. हे सरकार तुमच्या आमच्यासाठी नाही तर ते कशासाठी आलं हे त्यांनाही माहित नाही. शेतकर्यांनी पिक विम्यासाठी आत्ता आंदोलन केचलं, गावनिहाय शेतकर्यांना पीक विम्याची मदत मिळायला पाहिजे, मागच्या वेळेस आम्ही सरकारमध्ये असताना 745 कोटी बीड जिल्ह्याला मिळाले, आता फुटकी कवडीही मिळाली नाही. बीड जिल्ह्यातील शेतकर्यांच्या हक्काचे पैसे जोपर्यंत मिळणार नाहीत तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाहीत, भलेही आम्ही विरोधी बाकावर आहोत परंतु अजितदादांच्या नेतृत्वात सरकारला झुकवू. प्रकाशदादांनी मतदारसंघाचा मोठा विकास केला. आमच्या ताईसाहेब कॅबिनेटमंत्री होत्या, त्यांना परळीमध्ये एमआयडीसी आणता आली नाही, परंतु राज्यमंत्री असताना प्रकाशदादांनी माजलगावमध्ये एमआयडीसी आणली. बीड जिल्ह्यातल्या सर्व नगरपालिका आणि संस्थांवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवला जाईल. बीड जिल्ह्यात सहाही विधानसभा मतदारसंघात पुढचे आमदार हे राष्ट्रवादीचे असतील. खासदार हा राष्ट्रवादीचाच असेल, असा शब्द मुंडेंनी या वेळी अजितदादांना दिला.