बीड (रिपोर्टर) राज्यात स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारने महाराष्ट्राशी गद्दारी करत राज्यात येणारे मोठमोठे उद्योग धंदे हे निष्काळजीपणा दाखवत गुजरातला जात असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्यांसह कार्यकर्त्यांनी आज बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. राज्यातील बेरोजगार तरूणांच्या तोंडातून त्यांच्या हक्काची भाकरी काढल्याचे सांगत शिंदे फडणवीस सरकारच्या कार्यप्रणालीचा धिक्कार केला. हे आंदोलन आ.संदिप क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
याबाबत अधिक असे की, राज्यात होवू घातलेला वेदांताचा प्रकल्प हा गुजरातमध्ये गेला. दिड लाख बेरोजगारांना रोजगार देणारा हा प्रकल्प आणि मोठ्या प्रमाणावर म्हणजेच तीस हजार कोटीपेक्षा जास्त रूपयांची जीएसटी देणारा हा प्रकल्प महाराष्ट्रात होणार होता. मात्र राज्यात नव्याने स्थापन झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सरकारने या प्रकल्पाकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे हा प्रकल्प महाराष्ट्रात न होता थेट गुजरातमध्ये गेला. सदरचा प्रकल्प हा महाराष्ट्रातील बेरोजगार तरूणांसाठी वरदान देणारा होता. सरकारच्या या दुर्लक्षपणामुळे आणि निष्काळजीपणामुळे हा प्रकल्प गेल्याचा आरोप करत राज्यातले शिंदे-फडणवीस सरकार हे गुजरातची चाकरी करत असल्याचे म्हटले. संतप्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. सदरचे आंदोलन हे आ.संदिप क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. या आंदोलनात के.के.वडमारे, वाघमारे, राजु महुवाले, चव्हाण, पवन तांदळे, नंदकुमार कुटे, बाळासाहेब गुजर, पंकज बाहेगव्हाणकर, विद्या जाधव चौरे यांच्यासह आदिंची उपस्थिती होती.