बीड (रिपोर्टर) बीड जिल्ह्यात मुलं पळवणारी टोळी आली असून ती मुलांना किडनॅप करत त्यांच्या किडन्या काढून घेत असल्याची अफवा मोठ्या प्रमाणात पसरली होती. हे प्रकरण दै.रिपोर्टरने पोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या निदर्शनास आणुन देताच त्यांनी तात्काळ अधिकृत नोटीस काढून ती केवळ मुलं पळवणारी टोळी केवळ अफवा असून अशी अफवा पसरविणार्यावर तात्काळ कारवाई केली जाईल असे आदेश काढल्याने मोठा संभ्रम दुर झाला.
बीड जिल्ह्यात मुलं पळवणारी टोळी आली असल्याची अफवा गेल्या चार पाच दिवसापासून पसरत होती. कोणीही कसलीही शहानिशा न करता आमुक आमुक गावातून पोरं उचलून नेले, तुमुक गावात टोळी आली, या या ठिकाणी हि टोळी पोलिसांनी पकडली असे जुने व्हिडीओ व्हायरल करून बीड जिल्ह्यात भितीचे वातावरण निर्माण केले जात होते. याबाबत काल दै.रिपोर्टरने थेट पोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांना अशा अफवा पसरविणार्यांना काही नोटीस व्हाटसअॅपवर टाकून त्यांना माहिती देत दै.रिपोर्टरमध्ये वृत्त प्रकाशित केले होते. याची दखल घेत पोलिस अधिक्षकांनी तात्काळ अधिकृत नोटीस काढून जिल्ह्यात कुठेही अशा टोळ्या आल्या नाहीत. पोलिसांचा शाळेभोवती तगडा बंदोबस्त आहे. ज्या गावात अफवा पसरल्या आहेत त्याठिकाणी पोलिस पाठवून शहानिशा करून घेतली आणि अफवा ही केवळ अफवा असल्याची स्वत: त्यांनी नोटीस काढली. त्याचबरोबर सर्व ठाणेप्रमुखांनाही नोटीस काढायला लावली. त्यामुळे जिल्ह्यात गेल्या पाच सहा दिवसापासून सुरू असलेला संभ्रम दुर झाला.