केज (रिपोर्टर) ऑगस्ट महिन्यामध्ये पावसाने उघडीप दिल्याने बीड जिल्ह्यातील सोयाबीनचे मोठे नुकसान झाले. नुकसान होऊनही विमा कंपनी विमा देण्यास नकार देत असल्याने आज केज येथील सर्वपक्षीय नेते एकत्रित आले. सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात पाऊन तासात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती. विमा कंपनीसह शासनाच्या निषेधार्थ आंदोलनकर्त्यांनी प्रचंड प्रमाणात घोषणाबाजी केली. विमा आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा यासह इतर घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
बीड जिल्ह्यातील लाखो शेतकरी दरवर्षी विविध पिकाचा विमा भरतात. विमा कंपनी नुकसान होऊनही सर्व शेतकर्यांना विम्याचा लाभ देत नाही. यावर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये फक्त तीन दिवस पाऊस पडला. सत्तावीस दिवस पावसाने उघडीप दिल्याने सोयाबीन पिकाचे बरेच नुकसान झाले. जिल्ह्यात सर्वाधिक सोयाबीनचा पेरा झालेलाआहे. नुकसान होऊनही विमा कंपनी मात्र 25 टक्क्याचा लाभ देण्यास नकार देत असल्याने शेतकर्यात संताप व्यक्त केला जात आहे. शेतकरी आता कंपनीच्या विरोधात रस्त्यावर उतरू लागलेत. बीडमध्ये याच मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन देखील झाले होते. आज केज येथील सर्वपक्षीय नेते एकत्र आले. या नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात पाऊन तास रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनात सर्वपक्षीय नेत्यांसह कार्यकर्त्यांची व शेतकर्यांची उपस्थिती होती. आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती. विमा कंपनी व शासनाच्या निषेधार्थ प्रचंड प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली. आपल्या मागण्यांचे निवेदन प्रशासकीय अधिकार्यांकडे सापेवण्यात आले.