बीड (रिपोर्टर) राज्य सरकारने 20 पेक्षा कमी मुलांची संख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतल्याने या निर्णयाच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे. शासनाने शाळा बंद करू नये या मागणीसाठी आज नागरी समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली. या वेळी विविध पक्ष, संघटनेचे कार्यकर्ते आंदोलनात सहभागी होते.
गेल्या काही दिवसांपुर्वी राज्य सरकारने 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय नियमबाह्य असून गोरगरिबांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत असल्याचा आरोप करत शाळा बंद करू नये या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली. या आंदोलनामध्ये शिक्षण प्रेमींसह विविध पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा सहभाग होता. आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.