बीड (रिपोर्टर) बीड जिल्ह्यामध्ये शुन्य पटाच्या तीन शाळा असून या शाळेवर पाच शिक्षक कार्यरत आहेत. या पाच शिक्षकांसह 21 शिक्षकांचे समायोजन करण्याची प्रक्रिया जिल्हा परिषदेमध्ये सुरू आहे. सुरूवातीच्या काळात पद रिक्त नसल्यामुळे या शिक्षकांना प्राथमिक शिक्षक या पदावर पदस्थापना दिली होती. मात्र त्यानंतर पद रिक्त झाल्याने त्यांना सहशिक्षक या पदावर पदस्थापना समायोजनातून देण्यात येत आहे.
बीड जिल्ह्यामध्ये धारूर तालुक्यातील कानोबा तांडा याठिकाणी एकही मुल शाळेत नाही. किंवा एकाही मुलाने शाळेत प्रवेश घेतलेला नाही. त्यामुळे या शाळेचा पट शुन्य आहे. सोबतच केज तालुक्यातील शिवाचीवाडी याही शाळेचा पट शुन्य आहे. आणि पाटोदा तालुक्यातील ससेवाडीवस्ती या ही शाळेचा पट शुन्य आहे. या तीन शाळेवर शुन्य पट विद्यार्थी संख्या असताना पाच शिक्षकांना पदस्थापना देण्यात आली होती. त्यामुळे येथील पाच शिक्षकांना ज्या ठिकाणी जागा रिक्त आहे त्याठिकाणी पदस्थापना देण्यात येत आहे. उर्वरित सोळा शिक्षकांना पदवीधर शिक्षक हि पात्रता असताना सुध्दा 1 ते 4 वर्गावरच्या शाळेवर प्राथमिक शिक्षक म्हणून पदस्थाना दिली होती मात्र पदवीधर शिक्षकांच्या काही जागा रिक्त झाल्यामुळे त्यांना पदवीधर सहशिक्षक म्हणून समायोजनेत पदस्थापना देण्यात येत आहे. त्यामुळे आज शुन्य पटाच्या तीन शाळेतील शिक्षक आणि इतर सोळा शिक्षकांना समायोजन करण्यात येत आहे.