भाजपा महाराष्ट्र द्वेष्ट्या; राज्यभरात शिंदे-फडणवीस सरकारविरूध्द संताप; गेल्या तीन महिन्यात चार प्रकल्प राज्याबाहेर गेले
मुंबई (रिपोर्टर) 2014 च्या निवडणूकीत भाजपाकडून कुठे नेवून ठेवलाय माझा महाराष्ट्र? हा सवाल विचारत काँग्रेस राष्ट्रवादीचे वाभाडे काढले होते. मात्र सत्ता हेच सर्वस्व मानणार्या भारतीय जनता पार्टीने विरोधी पक्षाबरोबर थेट महाराष्ट्राचे वाभाडे काढण्याबरोबर त्याला नागवण्याचेही धोरण आखले का? असा सवाल उपस्थित होत असून गेल्या तीन महिन्याच्या कालखंडात शिंदे-फडणवीसांच्या कारकिर्दीत महाराष्ट्रातून एक नव्हे, दोन नव्हे तब्बल चार मोठे प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याने शिंदे-फडणवीस कुठे नेवून ठेवताय महाराष्ट्र? हा जाहिर सवाल आता राज्यातून विचारला जात आहे. वेदांता, टाटा एअरबससह अन्य दोन प्रकल्प सौराष्ट्रात गेल्याने महाराष्ट्राचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे.
तब्बल दीड लाख कोटींची गुंतवणूक असणारा वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला जाऊन दीड महिना उलटत नाही तोच आणखी एक टाटा-एअरबसच्या रुपाने राज्याने आणखी एक प्रकल्प हातातून घालवला आहे. गेल्या तीन महिन्यांमध्ये महाराष्ट्रातील तीन प्रकल्प गुजरातमध्ये गेले आहेत. पहिल्या दोन प्रकल्पांवेळी राजकीय वादंग निर्माण झाल्यामुळे टाटा-एअरबसचा नागपूरच्या मिहान येथील प्रस्तावित प्रकल्प महाराष्ट्राच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाचा होता. हा प्रकल्प महाराष्ट्रात राहिला असता तर राज्यात तब्बल 22 हजार कोटीची आर्थिक गुंतवणूक झाली असती. तसेच अभियांत्रिकी महाविद्यालयातून बाहेर पडणार्या तरुणवर्गाला मोठ्याप्रमाणावर रोजगार उपलब्ध झाला असता. त्यामुळे टाटा-एअरबस प्रकल्प गुजरातला जाणे, ही महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारसाठी मोठी नामुष्की ठरली आहे.
गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात भारतानं एअरबस सोबत सी-295 विमानांच्या निर्मितीसाठी 21 हजार कोटींचा सामंजस्य करार केला होता. या विमानांसाठी भारताने तब्बल 21,935 कोटी रुपये मोजले आहेत. भारतीय हवाई दलातील जुन्या झालेल्या -तठज-748 या विमानांची जागा सी-295 विमानं घेणार आहेत. एअरबस डिफेन्स अँड स्पेस (स्पेन) 2023 पर्यंत भारतीय हवाईदलाला 16 विमाने तयार करुन देणार आहे. तर उर्वरित 40 विमानांची निर्मिती ही बडोदा येथील टाटा-एअरबस प्रकल्पात केली जाईल. बडोद्यातील कारखान्यात तयार होणारी ही विमान भारतीय हवाईदलातील सध्याच्या -तठज-747 या विमानांची जागा घेतील. हा प्रकल्प केवळ या 40 विमानांपुरताच मर्यादित नाही. भविष्यात भारतीय लष्करासह नागरी उड्डाणासाठी लागणार्या विमानांचीही निर्मिती होणार आहे. प्रकल्प इतका महत्वाचा आणि हजारो करोडो रूपये गुंतवणुकीचा असताना शिंदे-फडणवीस सरकारला हा प्रकल्प राज्यात ठेवणे जमले नाही. हजारो बेरोजगारांना नौकरीची संधी या प्रकल्पातून नक्कीच मिळाली असती. टाटा एअरबस, वेदांता यासह अन्य चार प्रकल्प राज्याच्या बाहेर सौराष्ट्रात गेले. यातून भाजप महाराष्ट्राला आर्थिकदृष्ट्या खिळखिळं करू पाहत असल्याचे उघड चित्र दिसून येत आहे.