बीड (रिपोर्टर) बीड जिल्हा भाजपा पदाधिकार्यांची महत्वपूर्ण बैठक सोमवार रोजी बीड येथे आयोजीत करणयात आली आहे. या बैठकीला सहकारमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे, खा.प्रितम मुंडे, मराठवाडा संघटक संजय कोडगे, हे उपस्थित राहणार असल्याचे मॅसेज जिल्हा भाजपा कार्यालयाकडून पदाधिकार्यांपर्यंत पोहोचले आहेत. मात्र या बैठकीला पंकजा मुंडे गैरहजर असल्याचे दिसून येते.
31 ऑक्टोबर सोमवार रोजी बीड जिल्हा भारतीय जनता पार्टीची महत्वपूर्ण बैठक आयोजीत करण्यात आली आहे. समर्थ मंगल कार्यालयात होणार्या या बैठकीसाठी आमदार, प्रदेश पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी, प्रमुख पदाधिकारी, मंडल अध्यक्ष, सर्व मोर्चाचे आघाडीप्रमुख, शिक्षक आघाडी पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक यासह अन्य जणांना बोलावण्यात आले आहे. सदरची बैठक ही राज्याचे सहकारमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष खा.प्रितम मुंडे, भाजपाचे मराठवाडा संघटक संघटनमंत्री संजय कोगडे यांच्या उपस्थितीत होत आहे. या बैठकीला भाजपाच्या राष्ट्रीय सचिव तथा माजीमंत्री पंकजा मुंडे उपस्थित नसल्याचे जिल्हा भाजपाकडून पदाधिकार्यांना पाठवण्यात आलेल्या मॅसेजमधून दिसून येते. पंकजा मुंडे बैठकीला गैरहजर राहण्याचे कारण गुलदस्त्यात आहे.