नेकनूर (रिपोर्टर) नेकनूर रूग्णालयामध्ये अनेक कर्मचार्यांचा तुटवडा निर्माण झाल्याने त्याचा परिणाम रूग्णालयाच्या कामकाजावर होत आहे. आज तर गोळ्या वाटप करण्यास एकही कर्मचारी उपस्थित नसल्याने कित्येक रूग्ण वाट पाहत बसलेले दिसून आले. या प्रकरणी वरिष्ठ अधिकार्यांनी दखल घेवून या रूग्णालयात नियमीतपणे औषध वाटप करण्यासाठी कर्मचार्यांची नियुक्ती करावी अशी मागणी होवू लागली.
जिल्हाभरातील अनेक रूग्णालयामध्ये डॉक्टरांसह इतर कर्मचार्यांचा तुटवडा आहे. आरोग्य विभागाकडून भरती प्रक्रिया राबवली जात नसल्याने कर्मचारी कमी आहेत. नेकनूर येथील कुटीर रूग्णालयामध्ये औषधांचे वाटप करण्यासाठी कर्मचार्यांची नियुक्ती केलेली असली तरी आज एकही कर्मचारी उपस्थित नव्हता. ज्या रूग्णांनी डॉक्टरांना दाखवले ते रूग्ण औषध भांडार विभागामध्ये कर्मचार्याची वाट पाहत बसलेले होते. दरम्यान याठिकाणच्या कर्मचार्यांना इतर ठिकाणी नियुक्ती दिली असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे या रूग्णालयामध्ये फार्मासिस्ट कर्मचारी उपस्थित नव्हता. रूग्णांची गैरसोय होवू नये यासाठी वरिष्ठांनी तात्काळ फार्मासिस्टची नियुक्ती करावी अशी मागणी केली जात आहे.