मुंबई (रिपोर्टर) काँग्रेसचे विदर्भातील ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी उर्जामंत्री नितीन राऊत हे मंगळवारी तेलंगणात ’भारत जोडो यात्रे’दरम्यान झालेल्या धक्काबुक्कीत जखमी झाले. नितीन राऊत यांच्या चेहर्याला जबर मार लागला आहे. सध्या हैदराबादमधील एका रुग्णालयात नितीन राऊत यांच्यावर उपचार सुरु आहेत. मात्र, आता काही जणांकडून या दुर्घटनेचे खापर शिंदे-फडणवीस सरकारवर फोडले जात आहे. काही दिवसांपूर्वीच शिंदे-फडणवीस सरकारने संजय राऊत, भास्कर जाधव, छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात यांच्यासह महाविकास आघाडीतील 17 नेत्यांची सुरक्षा काढून घेतली होती. यामध्ये नितीन राऊत यांचाही समावेश होता.
त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून नितीन राऊत यांच्यासोबत पोलिसांची सुरक्षा नव्हती. एखाद्या नेत्याला एका राज्यात सुरक्षा असेल तर दुसर्या राज्यात ही सुरक्षा लाभते. डॉ.नितीन राऊत यांची सुरक्षा महाराष्ट्र सरकारने काढून घेतल्याने तेलंगणात त्यांना सुरक्षा नव्हती. त्यामुळे नितीन राऊत हे व्हीआयपी नसल्याचे स्थानिक पोलिसांच्या लक्षात आले नाही. गर्दी आणि धक्काबुक्कीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला. पोलिसांनी सामान्य माणूस समजून दिलेल्या धक्क्याने डॉ.नितीन राऊत खाली पडले आणि जखमी झाले. कदाचित सुरक्षा असती तर ही दुर्घटना घडली नसती. त्यामुळे नितीन राऊत हे जखमी होण्यासाठी एकप्रकारे शिंदे-फडणवीस सरकारच जबाबदार आहे, असा आरोप काही जणांकडून केला जात आहे.