बीड (रिपोर्टर) पाणी साठवून ठेवण्यासाठी जिल्ह्यातल्या अनेक छोट्या मोठ्या नद्यावर बंधारे बांधण्यात आले. मात्र बहुतांश बंधार्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने हे बंधारे वाहून गेले. खुड्रस परिसरातील बकी नदीवर पाच बंधारे गेल्या तीन वर्षापूर्वी बांधण्यात आले होते. यातील दोन वाहून गेले आणि तीन बंधार्यावर दरवाजे बसवले नसल्याने या बंधार्याचा कसलाही फायदा परिसरातील शेतकर्यांना होत नाही. गुत्तेदार पोसण्यासाठी अशा पध्दतीचे निकृष्ट बंधारे बांधण्यात आले की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
गेल्या काही वर्षापासून महाराष्ट्रात बंधारे बांधण्यात येत आहे. बंधार्यामुळे शेतकर्यांना उन्हाळ्यात शेतीला पाणी देता येते. आजूबाजूच्या विहिरींना पाणी वाढते. हा चांगला दृष्टीकोन समोर ठेवून बंधारे बांधले जात असले तरी या बंधार्याचे काम चांगल्यापध्दतीने होत नसल्याच्या अनेक तक्रारी सातत्याने समोर येत आहे. बीड तालुक्यातील खुंड्रस डिग्रस येथील बकी नदीवर तीन वर्षापूर्वी पाच बंधारे बांधण्यात आले होते. यातील दोन बंधारे पाण्याने फुटून वाहून गेले. तीन बंधार्यावर दरवाजे बसवण्यात आलेले नाहीत. दरवाजेविना बंधारे कुठल्या कामाचे असा प्रश्न उपस्थित होत आहे. निकृष्ट दर्जाचे बंधारे बांधून संबंधीत गुत्तेदार व अधिकार्याने स्वत:चे खिसे भरण्याचे काम केले असून या प्रकरणाची चौकशी होवून दोषीविरोधात कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.