चोरट्यांचे पोलिसांना पुन्हा खुले आव्हान ; गेवराई शहरातील गणेशनगर भागात दिवसा ढवळ्या महिलेच्या गळ्यातील सोने ओरबडले
————————
काल दुपारी शहरातून एक स्कुटी तर रात्री कुंभारवाडी फाटा येथून पल्सर पळवली
——————–
पहाटे बायपास वर कंटेनर अडवून 200 लिटर डिजल व 5 हजार रोख रक्कम लंपास
——————
गेवराई (रिपोर्टर) गेवराई पोलीस ठाण्याअंतर्गत रोजच्या रोज घडत असलेल्या चोरीच्या घटना काही केल्या थांबत नसून काल शहरातील गणेश नगर भागातून एका महिलेचा अंगावरील 12 ग्रॅम सोने ओरबाडून नेले तर शहरातील महेश कॉलनी येथून एक स्कुटी व कुंभारवाडी फाटा येथून एक पल्सर गाडी चोरी व आज पहाटे गेवराई बायपास वर एक कंटेनर अडवून चालकाला मारहाण करत 200 लिटर डिजल व पाच हजाराची रोख रक्कम लंपास करत चोरट्यांनी पुन्हा गेवराई पोलिसांना खुले आव्हान दिले आहे.
गेवराई पोलिसांच्या हप्तेखाऊ धोरण व वसुली मोहिमेमुळे ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी यांच्यात निर्माण झालेल्या अंतर्गत कलहामुळे कुणीच मन लावून काम करत नसल्याने या घटना घडत असल्याचा प्रकार समोर येत आहे. एकीकडे रोज च्या रोज घटना घडत असताना गेवराई पोलिसांना एकही ठोस कारवाई करता येत नाही हे दुर्दैवच म्हणावे लागेल. मागील दोन दिवसांपूर्वीच शहरातून कारची चोरी, पाडळसिंगी येथील रोड रोबरीच्या घटना ताज्या असतानाच पुन्हा तीनचार वेगवेगळ्या चोरीच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये तालुक्यातील आडगाव येथील नातवाच्या शिक्षणासाठी शहरात राहणाऱ्या एका महिलेच्या अंगावरील 12 ग्रॅम सोने भर दुपारी ओरबाडून नेल्याची घटना शहरातील गणेश नगर भागात घडली, यानंतर काल दुपारी शहरातील महेश कॉलनी येथून एक स्कुटी लंपास केली हा चोरटा सीसीटीव्हीत कैद झाला असून अद्याप याचा शोध लागला नसताना तिकडे ग्रामीण भागातील कुंभारवाडी फाटा येथील कृष्णनगर येथून पांडुरंग शिंदे यांची एम.एच. -23 बी.डी. – 5388 या क्रमांकाची पल्सर गाडी व घरासमोरील एक वशिंग मशीन लंपास केली. तर इकडे गेवराई शहरातून जाणाऱ्या बीड जालना रोडवरील गेवराई बायपास वर चेन्नई वरूण गूजरातला जाणाऱ्या केमिकल लोड कंन्टेनरला हात दाखवून गाडी थांबताच चालक व किन्नर यांना जबर मारहाण करत गाडीत असलेले २०० लिटर डिझेल व पाच हजार रोख रक्कम असा एकूण पंचवीस हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. मात्र रोज कुठे ना कुठे चोरीच्या घटना घडत असताना गेवराई पोलीस ठाण्याचे प्रमुख पोलीस निरीक्षक रवींद्र पेरगुलवार मात्र कुठलीच ठोस कारवाई करताना दिसून येत नाहीत तर वरिष्ठांकडूनही याबाबत काहीच कारवाई होत नसल्याने गेवराई शहरातील नागरिकांकडून पोलिसांवर प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. तर रोज रोज घडणाऱ्या घटनेबाबत कुठलीस ठोस कारवाई होत नसल्याने हे चोरटे आता गेवराई पोलिसांना खुले आव्हान देत असल्याचे दिसून येत आहे.
————
*एस पी साहेब ठाणे प्रमुखाला किती दिवस पाठीशी घालणार*
————————
गेवराई शहरासह परिसरातील चोरीच्या गुन्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढ होत असून तपास मात्र शून्य असल्याचे दिसून येत आहे. तर एकीकडे चोरीच्या घटनेत वाढ होत असताना पोलीस प्रशासन हे वाळू वाहतूक व अवैध धंद्याच्या वसुलीत दंग असल्याचे दिसून येत आसताना गेवराई पोलीस ठाण्याअंतर्गत वाढत असलेले चोऱ्यांचे सत्र थांबता थांबत नसल्याने नागरिकांत व वाहन धारकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत एवढी ओरड होत असतानाही वरिष्ठांकडून पोलीस निरीक्षक रवींद्र पेरगुलवार यांच्या निष्क्रिय कारभाराबाबत त्यांना पाठीशी घालण्याचे काम होत असल्याने यापूर्वी तीन वर्षांपूर्वी तत्कालीन पोलीस निरीक्षक बाळासाहेब बडे यांच्या काळात अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. तेव्हा आमदार लक्ष्मण पवार यांच्या नेतृत्वाखाली शहरातील नागरिकांनी थेट पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला होता यानंतर आठ दिवसात बडे यांची बदली करण्यात आली व यानंतर सर्व कारभार सुरळीत झाला होता. त्यामुळे एसपी साहेबांनी स्वतः लक्ष घालून गेवराई पोलिसांना समज द्यावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.