पाटोदा (रिपोर्टर) अतिरिक्त पावसाने शेतकर्यांच्या खरीप पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. याची सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी आज पाटोदा उपविभागीय कार्यालयावर शेतकर्यांचा जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. हा मोर्चा आ. बाळासाहेब आजबे यांच्या नेतृत्वाखाली निघाला होता. या मोर्चात मतदारसंघातील हजारो शेतकरी सहभागी झाले होते.
गेल्या काही दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यासह मराठवाड्यामध्ये अतिरिक्त पावसाने धुमाकूळ घातला होता. या पावसाने होत्याचं नव्हतं झालं होतं. शेतकर्यांच्या खरीप पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. सोयाबीन, कापूस ही दोन्ही नगदी पिकं वायाला गेली. उत्पादनात घट आली. शासनाने नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले असले तरी पंचनामे करण्यापेक्षा सरसकट नुकसान भरपाई राज्य सरकार का देत नाही? असा प्रश्न उपस्थित करत सरसकट मदतीसाठी आज पाटोद्याच्या उपविभागीय कार्यालयावर शेतकर्यांचा जनआक्रोश मोर्चा निघाल होता. हा मोर्चा आ. बाळासाहेब आजबे यांच्या नेतृत्वाखाली आयोजीत करण्यात आला होता. मोर्चामध्ये आष्टी, पाटोदा, शिरूर या तालुक्यातील हजारो शेतकर्यांची उपस्थिती होती. राज्य सरकारच्या निषेधार्थ प्रचंड प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली. शासनाने तात्काळ शेतकर्यांना मदत करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांच्या वतीने करण्यात आली. आपल्या मागण्यांचे निवेदन प्रशासकीय अधिकार्यांकडे देण्यात आले आहे.