आगामी जि.प., पं.स. निवडणुकीसाठी ग्रामपंचायत महत्वाची, निवडणुकीत साम-दाम-दंडाचा वापर, आतापासूनच पैशाचा प्रचंड घोडेबाजार
बीड (रिपोर्टर) आगामी स्थानीक स्वराज्य संस्था निवडणुकांसह विधानसभा निवडणुकांमध्ये खारीचा नव्हे तर सिंहाचा वाटा उचलणार्या दोन हजारापेक्षा जास्त मतदार असलेल्या ग्रामपंचायतींकडे जिल्ह्यातील मातब्बर नेत्यांचे लक्ष लागून असून आपल्या कार्यकर्त्यांना गाव सांभाळा अन् स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाव खावून जा, असे थेट आदेश दिल्याने 18 डिसेंबर रोजी होणार्या बीड जिल्ह्यातील 704 ग्रामपंचायत निवडणुकांची तयारी अंतिम टप्प्यात येऊन पोहचली असून गावागावात आपल्याच गटाचा सरपंच यावा यासाठी सर्वच पक्षांच्या नेत्यांनी अन् गाव पुढार्यांनी कंबर कसल्याचे दिसून येत आहे. अनेक ठिकाणी मोठ्या ग्रामपंचायतींना वित्त आयोगाचा मोठ्या प्रमाणावर पैसा येतो, तो पैसा डोळ्यांसमोर ठेवूनही अनेक जण व्यवहारीक पद्धतीने ग्रामपंचायत लढवण्यासाठी पुढे येत असल्याचे अनेक ठिकाणी दिसून येत आहे. त्यामुळे यावर्षी होणार्या बीड जिल्ह्यातल्या ग्रामपंचायत निवडणुकीत साम-दाम-दंडाची रेलचेल पाहायला मिळेल आणि प्रचंड घोडाबाजार या निवडणुकीत होईल, असे चित्र सध्या दिसून येत आहे.
बीड जिल्ह्यात 704 ग्रामपंचायतींसाठी 18 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. बीड तालुक्यात सर्वाधिक 132, अंबाजोगाई 83, आष्टी 109, धारूर 31, गेवराई 76, केज 66, माजलगाव 44, परळी 80, पाटोदा 34, शिरूर 24, वडवणी तालुक्यात 25 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. या सातशे चार ग्रामपंचायतींपैकी तब्बल अडीचशे ते तीनशे ग्रामपंचायती या दीड हजार ते साडेचार पाच हजार मतदार असलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. त्यामुळे उद्याच्या निवडणुकीला सर्वच पक्षांच्या नेतृत्वाकडून अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या आधी ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत असल्याने या निवडणुकीसाठी आणि या निवडणुकीतील विजयासाठी प्रत्येकजण आपली ताकद लावत आहे. गाव सांभाळा अन् स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाव मिळवा, असे स्पष्ट आदेश आमदार, खासदारांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिले आहेत. ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत आपल्या गटाचा अथवा पक्षाचा सरपंच निवडून आला तर त्याचा फायदा जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत होईल आणि तेथून तोच फायदा विधानसभेसाठी घेता येईल यासाठी जो तो प्रयत्नांची परिकाष्ठा करताना दिसून येत आहे. त्यामुळे अवघ्या महिनाभरावर आलेल्या मतदानापुर्वी गावागावांत निवडणूक लढवू इच्छिणारे कुठल्याही परिस्थितीत ग्रामपंचायत आपल्याच ताब्यात ठेवण्यासाठी प्रयत्नांची परिकाष्ठा करून साम-दाम-दंडाची तयारी ठेवू पाहत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे यावर्षी होणार्या निवडणुकीत पैशाचा घोडेबाजार मोठ्या प्रमाणावर होण्याची दाट शक्यता आहे.
पैशाचा घोडेबाजार कसा रोखणार?
वित्त आयोगामार्फत येणार्या निधीवर डोला ठेवून अनेक जर कुठल्याही परिस्थितीत ग्रामपंचायत आपल्याच ताब्यात यावी यासाठी साम-दाम-दंडाचा वापर करू पाहत आहेत. पैशाचा घोडेबाजार मोठ्या प्रमाणावर गावागावांत आतापासूनच पहावयास मिळत आहे. निवडणूक विभाग हा घोडेबाजार कसा रोखणार? याकडे सर्वांचे लक्ष आहे.
ही निवडणूक पुढार्यांसाठी का महत्वाची…
ग्रामपंचायतींमार्फत वित्त आयोग, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेसह विविध विकास योजनांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मिळतो. त्यामुळे स्थानिक पातळीवर या निवडणुकांना मोठे महत्त्व असते. मात्र, आपल्या गटाची बाजी राहावी यासाठी नेत्यांचीही ताकद पणाला लागते. त्यात आता जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या अगोदर होणार्या या निवडणुकांमुळे या निवडणुकीला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. यात ज्यांची ताकद दिसेल त्यांच्यासाठी पुढच्या निवडणुका सोप्या मानल्या जातात. सर्कल किंवा मोठ्या गावांतील ग्रामपंचायत जिंकल्याने जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या उमेदवारीवर दावेदारी सोपी जात असल्यानेही या निवडणुकांना महत्त्व आहे.