गणेश सावंत
मो. नं. 9422742810
एखादा समुह मोठा असेल, त्या समुहाचा इतिहास धगधगता असेल, त्या समुहाचा नेता युगपुरुष असेल, त्या युगपुरुषाचे सामर्थ्य जगदज्जेते असेल त्या युगपुरुषाच्या नुसत्या नावावर झोपलेला माणूस उठून बसत असेल, उठून बसलेला माणूस उभा राहत असेल, उभा राहिेला माणूस पळता होत असेल आणि जिथे तिथे पळत जावून यशाची, विजयाची पताका फडकवत असेल तर अशा समुहाला आणि त्या समुहाच्या जगज्जेत्या युगपुरुषाला अपमानित करा, त्याच्या इतिहासाची मोडतोड करा, त्याच्या सामर्थ्यात दुबळेपण आणा, त्याचे धगधगते विचार त्याच्या पाईकापेक्षा लहान आहेत हे दाखवा, त्याचे पाईक कसे सर्वश्रेष्ठ आहेत आणि युगपुरुषाचे सामर्थ्य कसे दुबळे होते हे अनपेक्षितपणे दाखवा, हा जो धंदा सध्या महाराष्ट्रातल्या मातीत काही नत्द्रष्य औलादी करत आहेत त्या माफी योग्य नाहीत. हे मराठ्यांच्या इतिहासाचे गनीम आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवचरित्राची मोडतोड करू पाहणारे शत्रू आहेत. आज पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्राची मोडतोड ‘हर हर महादेव’ नावाच्या चित्रपटातून केली जातेय. छत्रपती शिवाजी महाराजांची मावळ्यांना प्रेरणा जोश देणारी हर हर महादेव ही ललकारी शिवबांच्या भक्तांना चित्रपटाच्या माध्यमातून संताप आणून सोडणारी आहे. सातत्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा, त्यांच्या चरित्राचा आणि जिजाऊ मॉ साहेबांसह छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाबाबत गरळ का ओकली जातेय ? इतिहासाचे गनीम (शत्रु) आज का पैदा होतायत? मराठा हा शब्दप्रयोग आज काही जणांना का खटकतोय? याचं उत्तर शोधण्यापेक्षा इतिहासाचे गनीम होऊ पाहणार्यांना आता शोधलं पाहिजे आणि विचाराने त्यांना ठेचलं पाहिजे. आम्ही शिवाजी महाराज की जय म्हणतो, मात्र महाराजांचे विचार, महाराजांचे चरित्र डोक्यावर घेतोत डोक्यात घेत नाहीत. त्याचाच फायदा आज वड्यावगळीला पैदा होणार्या इतिहासाचे गनीम उचलतात आणि पुन्हा पुन्हा महाराजांच्या चरित्राला नख लावण्याचा प्रयत्न करतात. आज पुन्हा हर हर महादेवच्या माध्यमातून शिवचरित्राच्या गळ्याला नख लागले गेले. या आधीही अनेक वेळा छत्रपती शिवाजी महाराजांची शिवचरित्रातून मोडतोड करत अनेक वेळा अवहेलना करण्यात आली. कधी
मॉ जिजाऊंची अवहेलना
याच महाराष्ट्राच्या मातीत करण्यात आली. बाबासाहेब पुरंदरेसारखे इतिहासाचे लेखक आणि त्यांनी लेखन केलेल्या पुस्तकातील जिजाऊ मॉ साहेबांबद्दलचे शब्द हे संताप आणणारे. ज्या माणसाला आपल्या उभ्या आयुष्यात शिवचरित्राने ओळख दिली, पोटपुजा करण्याची बिदागी दिली, तो माणूस शिवचरित्राचा गनीम निघाला. याच माणसाने या आधी माफीनामाही लिहून दिला. जेम्स लेन सारख्या परदेशी लेखकाने मॉ साहेबांच्या पदराला हात घातला. छत्रपती शिवाजी महाराजांचे सातत्याने गुरू बदलून महाराजांना विशिष्ट समाजाच्या छत्रछायेखाली ठेवण्याचा हेतू कायम ठेवला. कधी गोब्राह्मण प्रतिपालक अशी बिरुदावली लावली, तर कधी फक्त ना फक्त हिंदुंचा राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना जगासमोर मांडण्याचा प्रयत्न झाला. जो राजा अखंड बहुजन प्रतिपालक कुळवाडी भूषण असा आहे तो राजा केवळ आणि केवळ मुसलमानांचा शत्रू हे दाखवण्याचा प्रयत्न सातत्याने झाला, होत आला आणि होत आहे. अशा स्थितीत जेव्हा इतिहासाचे संशोधक वाढले, वाचन संस्कृती बहुजनांच्या नशिबी आली, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे मराठा साम्राज्य हे जिजाऊ मॉ साहेबांच्या स्वप्नातून उभे राहीले. हे उभ्या जगाला माहित झाले. हे जेव्हा मराठ्यांच्या कर्तृत्वाचे पताके आपल्या राजकारणाला आडे येते हे लक्षात आले तेव्हा पुन्हा पुन्हा छत्रपतींच्या इतिहासाला फेरफार करण्यापेक्षा त्यावर बलात्कार करणे उचीत असे आजच्या इतिहासी गनीमाने बहुदा ठरवले. म्हणूनच हर हर महादेव मध्ये पुन्हा एकदा या इतिहासाच्या गनिमांनी आपली औकात दाखवली. यावर भाष्य करताना इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे म्हणतात,
हर हर महादेव मधला महाअपराध
‘हर हर महादेव’ या चित्रपटात तो महाअपराध केलेला आहे. बाजीप्रभू देशपांडेंची निष्ठा, शौर्य, त्याग, बलिदान प्रेरणादायकच आहे. परंतु बाजीप्रभू शिवरायांविरुद्ध लढतात, ते सिद्दी जौहरकडे जातात, तेच शिवा काशिदांना घेऊन येतात, तेच शिवाजी महाराज पन्हाळ्यातून निसटण्याचे नियोजन करतात ही सर्व द़ृश्ये जसा शिवरायांचा अवमान करणारी आहेत, तशीच ती बाजीप्रभूंच्या कार्यकर्तृत्वाचे भंजन करणारी आहेत. बाजीप्रभू एकनिष्ठ होते. त्यांनी घोडखिंडीत शौर्य गाजविले. ते प्रामाणिक होते. स्वराज्यनिष्ठ होते. परंतु ते आततायी, उथळ, उर्मट आणि शिवरायांच्या अंगावर धावून जाणारे नव्हते. तसे दाखवून निर्माता-दिग्दर्शकांनी जसा शिवरायांचा उपमर्द केला आहे, तसाच बाजीप्रभूंचा देखील उपमर्द केलेला आहे. बाजीप्रभूंबद्दल घृणा निर्माण व्हावी, असा हा चित्रपट आहे. बाजीप्रभू महान होते. परंतु ते बांदलांचे नेते नव्हते, बांदलांच्या फौजेतील ते एक प्रामाणिक सैनिक होते. समकालीन जेधे शकावलीत अफजलखानाच्या भेटीप्रसंगी उल्लेख येतो की ‘कान्होजी नाईक जेधे जमावाशिंसी व बादल देखील यांनी पारावरी चालोन घेऊन लस्करांत मारामारी केली, अगदी लस्कर बुडविले.’ यामध्ये बाजीप्रभूंचा उल्लेख नाही. पन्हाळा सुटकेच्या प्रसंगी जेधे शकावलीत उल्लेख येतो ‘पनालिस यावरून राजश्री स्वामी उतरोन खळवियांस गेले ते समई सिद्दी जोहार यांची फौज पाठीवरी आली। युद्धाची दाटी बहुत जाली तेव्हा बांदलाच्या लोकांनी युद्धाची शर्त केली. लोक स्वस्त झाले. बाजीप्रभु देश कुळकर्णी ठार झाला’ असा उल्लेख येतो. बांदलाच्या फौजेने लढा दिला. अनेक बांदल सैनिक ठार झाले. त्यामध्ये बाजीप्रभू ठार झाले, असा उल्लेख आहे. या चित्रपटात जिजाऊंच्या तोंडी असे एक वाक्य घातले आहे की, जे अनैतिहासिक आहे, ते म्हणजे ‘प्रभू रामाला जसे हनुमंत होते तसे शिवबाला हा बाजी.’ जेधे शकावलीमध्ये असे म्हटलेले नाही. तर ‘हनुमंत अंगद रघुनाथाला जेधे बांदल सिवाजीला’ असे म्हटले आहे. जेधे-बांदल हटवून केवळ बाजीप्रभूला आणणे हा ‘हर हर महादेव’ चित्रपट निर्माता-दिग्दर्शकाचा संकुचितपणा, जातीयवादी द़ृष्टिकोन नाही का? शिवरायांनी अफजलखानाला ठार मारले त्याप्रसंगी कृष्णाजी भास्कर कुलकर्णीने शिवरायांवर वार केला. हा भाग या चित्रपटातून वगळलेला आहे. याउलट अफजलखान शिवरायांच्या डोक्यात वार करतो असे दाखविलेले आहे. शिवाजीराजे अफजलखानाला मांडीवर आडवे बसवून हिरण्यकशपूप्रमाणे त्याचे पोट फाडतात असे दाखवून शिवरायांना नृसिंह अवताराशी जोडले आहे, की जे अनैतिहासिक आहे. चित्रपटातील भाषेचे, कलेचे, कलाकारांचे सौंदर्यशास्त्र सनातनी आहे. बाजीप्रभू बलदंड, राकट, पिळदार, भारदस्त दाखविले आणि शिवाजीराजांची भूमिका दुय्यम दर्जाच्या कलाकाराला देणे, मावळे राकट, दणकट, पिळदार, दुय्यम दर्जाचे दाखविणे ही बाब शिवकालीन भाषा, पेहराव, शरीरयष्टी याला काळिमा फासणारी आहे. असे असताना या चित्रपटाचे समर्थन करणारे केवळ पक्ष-संघटना इतकेच पाहत असतील तर ते स्वत:च्या पैदासीवर संशयकल्लोळ भविष्यात निर्माण करतील. जिथे बाप बदलला तरी संताप येत नाही, तिथे लाचारी नसा नसात भिनली हे सिद्धच होते. ‘हर हर महादेव’ आणि ‘वेडात वीर दौडले सात’ या चित्रपटांबद्दल छत्रपती शिवाजी
महाराजांचे वंशज
या चित्रपटातल्या संदर्भासह कलाकारांच्या वेशभुषांपासून मिशी नसलेल्या अभिनेत्यापर्यंत थेट भाष्य करून हे असे असतात का मावळे, माझ्याशी गाठ आहे, असे संतापून बोलतात तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची मोडतोड करण्यासाठी मराठा हा शब्दप्रयोग पुसण्यासाठी आजच्या इतिहासाचे गनीम किती आक्रमक आहेत हे दिसून येतं. सोळाव्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांचं मराठा साम्राज्य म्हणून ओळखलं जायचं. त्या मराठा साम्राज्याची ओळख मराठी साम्राज्य म्हणून दाखवण्याचा प्रयास, त्या मागचा हेतू हा बहुसंख्यक समाजाच्या लढवय्या श्रीमंतीवर दरोडा टाकणारा म्हणावा लागेल. युगपुरुषाला आणि मराठा समुहाला जाणीवपुर्वक डिवचण्याचा आणि त्याचा खरा इतिहास पुसून त्याच्या माथी खोटा इतिहास देण्याचा हा प्रयास जातीयतेच्या उतरंडी पुन्हा घराघरात लावण्याचा हा प्रयास म्हणावा लागेल. परंतु आता अशा गनिमांना शोधलं पाहिजे, म्हणूनच पुन्हा एकदा स्वराज्याच्या
खर्या इतिहासाचे तोरण
बांधण्यासाठी हर हर महादेवची ललकारी द्यावी लागेल. ही ललकारी देताना वाचन संस्कृती वाढवावी लागेल. जिजाऊ मॉ साहेबांचं चरित्र, शिवाजी महाराजांचं चरित्र, संभाजी राजेंचं चरित्र नुसतं डोक्यावर नाही तर ते डोक्यात घ्यावं लागेल. गडकोटांना भेटी देत शिवकालीन समयी झालेल्या प्रत्येक लढाया, प्रत्येक घटनाक्रम, प्रत्येक तह, प्रत्येक गडावरची विशिष्ट हकीकत समजून घेत गडकोटावर मुक्काम करावा लागेल. डोळे बंद करून छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मरण करत सोळाव्या शतकातलं ते शौर्य, ते सामर्थ्य, तो त्याग, तो इतिहास डोळ्यांसमोर आणावा लागेल. आणि तो आणताना गडावरच्या खाणाखुणा, पाऊलवाट, कडेकोट, बुरुज, दरवाजे याची देही याची डोळा पाहणी करावी लागेल. आजच्या तरुणांनी मराठा हा शब्दप्रयोग जातीवाचक न घेता मराठा साम्राज्याचा पुरस्कार करणारा घेऊन महाराजांच्या इतिहासात गोडी घेत उडी घ्यावी लागेल. तेव्हाच आजचे इतिहासातले गनीम सापडतील. त्या गनिमांचा कोथळा काढण्यात यश येईल.