बीड (रिपोर्टर) बीड जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी अनाधिकृत दारूची विक्री होतच आहे पण काही ठिकाणी बनावट दारू तयार करून ती विकली जाते. राजूरी येथे बनावट दारूचा कारखाना असल्याची माहिती दारूबंदी विभागाला झाल्यानंतर नांदेडच्या अधिकार्यांनी कारवाई केली. बीडच्या दारूबंदी अधिकार्यांबाबत संशय निर्माण होत असल्यामुळेच नांदेडच्या अधिकार्यांनी कारवाई केली की काय, असा संशय निर्माण होत आहे. ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात अनाधिकृत दारू विक्री होत असताना ग्रामीण पोलीस झोप घेत आहेत की काय, असा प्रश्नही निर्माण झाला आहे.
नवगण राजुरी येथे आकाश जाधव हा बनावट दारू तयार करून इतर ठिकाणी विक्री करत असे. याची भनक राज्य उत्पादन शुल्क विभागाला लागल्यानंतर बीडच्या नव्हे तर नांदेडच्या पथकाने काल राजुरी येथे येऊन कारवाई केली. जाधव याच्याकडून शंभर दारूचे बॉक्स जप्त करण्यात आले. त्याची सखोल चौकशी केली असता आपल्याकडे दारुचा बनावट कारखाना असल्याची माहिती त्याने अधिकार्यांना दिली. कारखान्यातून दारूचे साहित्य, मशिनरी, पुठ्ठे असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी नांदेड विभागाने जाधव याच्या विरोधात कारवाई केली. काही दिवसांपुर्वीच स्थानिक गुन्हे शाखेने बीड तालुक्यातील शिदोड परिसरात बनावट दारू कारखान्यावर कारवाई केली होती. त्यानंतर बीड ग्रामीण पोलिसांनी दारूची विक्री करणारी साखळी पकडली होती. नांदेड राज्य उत्पादन शुल्क विभागाने पकडलेला आरोपी हा शिदोड येथील आरोपीचा जवळचा नातेवाईक आहे. सर्वांच्या संगनमताने कारखाना चालत असल्याची माहिती समोर आली.