मुंबई (रिपोर्टर) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि वाद हे समीकरण काही केल्या सुटत नाहीय. कोश्यारी आज पुन्हा एकदा वादात सापडलेत. त्यांनी चक्क मुंबई हल्ल्यातील शहिदांना चप्पल घालून अभिवादन केलेय. राज्यपालांच्या अश्या बेजबाबदार वागण्यामुळे आणि बेताल बोलण्यामुळे राज्यात संताप वैक्त होत आहे .
मुंबईवरील 26/11 अतिरेकी हल्ल्याची जखम अजूनही भळभळतेय. या हल्ल्यात अनेक पोलिसांनी जीवाची बाजी लावून मुंबईकरांचे प्राण वाचवले. करकरे, कामटे, साळस्कर हे पोलिस अधिकारी लढता-लढता शहीद झाले. त्यांच्या कर्तृत्वाची आणि त्या काळ्याकुट्ट दिवसाची आठवणही काढली तरी उर भरून येतो. या शहिदांना अभिवादन करण्यासाठी मुंबई पोलिसांनी एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते.शहिदांच्या अभिवादन कार्यक्रमाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आनंद लिमये , पोलिस महासंचालक रजनीश सेठ व मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह इतर मंत्र्यांनी पादत्राणे काढून हुतात्मा स्मारकात शहिदांना अभिवादन केले. पुष्पचक्र अर्पण केले. मात्र, राज्यपाल कोश्यारी यांनी अभिवादनावेळी चप्पल काढली नाही. त्यामुळे ते पुन्हा एकदा वादात सापडलेत.अभिवादन कार्यक्रमात पोलिस बँड पथकाने ‘सलामी शस्त्र’ व ’बिगुलर लास्ट पोस्ट’ वाजविले. सर्व मान्यवर, गणवेशातील अधिकारी व पोलिस जवानांनी हुतात्म्यांना सलामी दिली. राज्यपालांनी उपस्थित हुतात्मा पोलिस कुटुंबातील सदस्यांची भेट घेतली. मात्र, आज अभिवादनावेळी चप्पल काढली नाही. कोश्यारी काही दिवसांपासून सतत वादात आहेत. यापूर्वी त्यांनी केलेली अनेक वक्तव्ये वादाच्या भोवर्यात सापडली. विशेष म्हणजे सात दिवसांपूर्वी त्यांनी शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून राज्यात वातावरण प्रचंड तापलेय.