गावगावच्या ग्रामपंचायतींकडे मातब्बरांचे लक्ष
बीड (ठिकठिकाणच्या रिपोर्टरकडून) जिल्ह्यातल्या 704 ग्रामपंचायत निवडणुकीचे उमेदवारी अर्ज परत घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. याच दिवशी चिन्ह वाटप होणार आहे. उद्यापासून निवडणूक प्रचाराची हलगी गावागावांत वाजताना दिसून येणार आहे. विधानसभा निवडणुकीत दबदबा निर्माण करू पाहणार्या गावातील ग्रामपंचायती आपल्याच ताब्यात ठेवण्याहेतू बीड जिल्ह्यातील सर्वच पक्षांचे नेते कामाला लागल्याचे दिसून येत आहे. बीड, परळी, अंबाजोगाई, माजलगाव, आष्टी, पाटोदा, केज विधानसभा मतदारसंघातल्या बहुतांशी ग्रामपंचायतींसाठी या टप्प्यात निवडणुका होत आहेत.
राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या बीड जिल्ह्यात 704 ग्रामपंचायतींसाठी 18 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. आज उमेदवारांना चिन्ह मिळणार असून उद्यापासून जिल्हाभरातल्या 704 पेक्षा जास्त गावांमध्ये प्रचाराची रणधुमाळी प्रत्यक्षात सुरू होणार आहे. त्याअनुषंगाने आज उमेदवारी अर्ज परत घेण्याच्या शेवटच्या दिवशी तालुक्याच्या नेत्यांनी आपले सोयीचे उमेदवार निवडणूक रिंगणात कसे राहतील, याकडे प्रकर्षाने लक्ष दिल्याचे दिसून येते. बीडमध्ये माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, आ. संदीप क्षीरसागर, मुख्यमंत्री शिंदे समर्थक कुंडलिक खांडे, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्यासह अन्य नेत्यांनी आपआपल्या गावांवर लक्ष केंद्रित केल्याने तालुक्यातील अनेक गावच्या निवडणुकांमध्ये प्रचंड चुरस निर्माण झाली आहे. आष्टी, पाटोदा, शिरूर तालुक्यात सुरेश धस, भीमराव धोंडे, बाळासाहेब आजबे यांच्यासह अन्य पक्षांच्या पदाधिकार्यांनी लक्ष घातल्याने तेथेही अनेक ग्रामपंचायत निवडणुकीत अटीतटी पहावयास मिळत आहे. इकडे गेवराई तालुक्यात दोन्ही पंडितांसह विद्यमान आमदार लक्ष्मण पवार यांनी ताकद लावल्याने गेल्या आठवडाभरापासूनच प्रचाराची रणधुमाळी पहावयास मिळत आहे. परळी, अंबाजोगाई येथे मुंडे भाऊ-बहिणींनी निवडणुकांमध्ये लक्ष घातल्याचेही सांगण्यात येते. तर माजलगाव, केज विधानसभा मतदारसंघातही महत्वाच्या गावांसह छोट्या गावातील नेत्यांनी लक्ष घातले आहे. एकूणच उद्यापासून अधिकृतपणे प्रचाराची हलगी वाजणार आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस प्रशासन सतर्क झाले असून संवेदनशील आणि अतिसंवेदनशील गावांमध्ये पोलीस बंदोबस्तासह विघ्नसंतोषी लोकांना समज देण्याचे काम यंत्रणेकडून होत आहे.
558 जणांचे शस्त्र जमा
2330 मतदान केंद्रावर होणार मतदान
महाराष्ट्रात सर्वाधिक जास्त बीड जिल्ह्यातील 704 ग्रामपंचायतच्या निवडणूका होत आहेत. त्याअनुषंगाने जिल्ह्यात 2330 मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. त्यापैकी 185 मतदान केंद्र हे संवेदनशिल आहेत. तर 24 केंछद्र हे अतिसंवेदनशिल आहेत. त्यामध्ये बीड 24, गेवराई 6, आष्टी 28, पाटोदा 34, शिरूर 6, अंबाजोगाई 30, परळी 11, केज 12, धारूर 7, माजलगाव 8 आणि वडवणी तालुक्यात 9 केंेद्र हे संवेदनशील आहेत. त्याठिकाणी पोलिसांचा विशेष बंदोबस्त राहणार आहे. हि निवडणूक शांतेत पार पडावी यासाठी पोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकरू यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात 359 जणांना नोटीसा बजावल्या आहेत. तर 943 पैकी 585 जणांचे शस्त्र जमा करून घेतले आहेत. जिल्ह्यात निवडणूक दरम्यान गोंधळ घालणार्यांवर 36 गुन्हे आहेत.