जातीपातीच्या राजकारणावर भर
बीड (रिपोर्टर) :- गेल्या दोन दिवसापासून गावकी ताब्यात घेण्यासाठी भावकी कामाला लागली आहे. पाच वर्षे गावाकडे न फिरकणारे लोक गावात येवू लागले आहेत. प्रचाराचा नारळ फोडतांना जो तो शक्तीप्रदर्शन करत आहे. आपला, परका कोण हे समजून सांगत आहे. मात्र विकासावर कोणी बोलतांना दिसत नाही. फक्त जातीपातीच्या राजकारणाचा प्रचार सुरु असल्याने विकाचे मुद्दे प्रचारातून बाजूला राहत आहेत.
महाराष्ट्रात सर्वाधिक बीड जिल्ह्यात 704 ग्रामपंचायतीच्या निवडणूका लागल्या आहेत. मतदान अवघ्या आठ दिवसांवर म्हणजे 18 डिसेंबर रोजी होत आहे. गेल्या तीन दिवसापूर्वी उमेदवारांना चिन्ह मिळाले असल्याने जो तो प्रचाराला लागला आहे. मोठ शक्तीप्रदर्शन करत प्रचाराचे नारळ गावागावात फुटले. मात्र या दरम्यान विकासावर भर देण्यापेक्षा अनेकांनी हेवे- दावे काढले, जवळचा परका, जात, भावकी, घरातल घर, सोयरा- धायरा हे पाहून मत मागणारी जमात गावा गावात फिरु लागली. यात विकास? कुठं हे मतदारही विचारत नाहीत अन् गावपुढारीही सांगत नाहीत. त्यामुळे गावचा विकास कसा होणार?
सोशल मिडियाचा प्रचार धुळफेक करणारा
ग्रामपंचायत निवडणूकीत गाव पुढारी एक-एक मताचा हिशोब ठेवतात, मात्र काही जण सोशल मिडियावर पोस्ट टाकून आपलीच हवा असल्याचे दाखवून देतात. त्याला मतदार नसलेले गावकुसाबाहेरचे शेकडो लोक लाईक ठोकतात अन् तो आपल्याच तोर्यात असतो. शेवटी निकाल लागल्यावरचं त्याचे डोळे उघडतात.