संवेदनशील-अतिसंवेदनशील बुथवर राहणार पोलिसांचा तगडा बंदोबस्त
बीड (रिपोर्टर) राजकीयदृष्ट्या संवेदनशील मानल्या जाणार्या बीड जिल्ह्यात तब्बल 704 ग्रामपंचायतींसाठी उद्या सकाळपासून मतदानाला सुरुवात होणार असल्याने आजची रात्र उमेदवारांसाठी वैर्याची असणार आहे. गावपातळीवर कोण कुठे जातं? कोण काय वाटतं? मत विकलं जाणार का? खरेदी केलं जाणार का? यासाठी गावागावांत उमेदवारांचे कार्यकर्ते जागता पहारा ठेवण्याच्या तयारीत दिसून येत आहेत. उद्याच्या निवडणुकीत गावगावच्या प्रस्थापितांसमोर नवख्या आणि सुशिक्षीत उमेदवारांनी आव्हान उभे केल्याने अनेक गावातील ग्रामपंचायतीत प्रचंड चुरस निर्माण झाली आहे. दुसरीकडे मतदान शांततेत पार पडावं यासाठी प्रशासन सज्ज झाले असून संवेदनशील-अतिसंवेदनशील बुथवर पोलिसांचा तगडा बंदोबस्त राहणार आहे.
बीड जिल्ह्यातील 704 ग्रामपंचायतींपैकी 70 पेक्षा जास्त ग्रामपंचायती या मोठ्या असून या ग्रामपंचायतींवर सातत्याने प्रास्थापितांनी वर्चस्व स्थापन केलेले आहे. राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या बीड जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत फायदा व्हावा या हेतुने विद्यमान आणि माजी आमदारांनी गावागावांतल्या निवडणुकांमध्ये प्रचंड लक्ष घातलं आहे. काल प्रचार संपल्यानंतर आज दिवसभर उमेदवारांनी गाठीभेटींवर भ दिला आहे. आजची रात्र ही उमेदवारांसाठी वैर्याची रात्र असणार आहे. त्यामुळे उमेदवारांचे कार्यकर्ते जागता पहारा ठेवण्याच्या तयारीत आहेत. काही ठिकाणी मतांची खरेदी होण्याची दाट शक्यता असल्याने कार्यकर्त्यांसह प्रशासनाची करडी नजर अशा गावांवर राहणार आहे. बीड तालुक्यासह अन्य तालुक्यातही ग्रामपंचायत निवडणुकीत प्रचंड चुरस निर्माण झाल्याचे दिसून येत असून काही ठिकाणी तिरंगी लढती होणार असल्याने त्याठिकाणी आपलं वर्चस्व सिद्धीस नेण्याहेतू राजकारण्यांकडून साम-दाम-दंडाचा वापर होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील संवेदनशील आणि अतिसंवेदनशील बुथवर पोलीस प्रशासनाचा तगडा बंदोबस्त राहणार असल्याचे यंत्रणेकडून सांगण्यात आले. गावगावचे प्रस्थापीत ग्रामपंचायत आपल्याच ताब्यात राहावी यासाठी प्रयत्नांची परिकाष्ठा करत असले तरी नवख्या उमेदवारांनी प्रस्थापीतांना तगडे आव्हान दिले आहे. उद्या सायंकाळी पाच वाजता या सर्व उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे.