राज्य सरकारने घेतला उपक्रम हाती
शिक्षण व्यवस्था अद्यावत करण्याचा प्रयत्न
बीड (रिपोर्टर) राज्यभरातील शालेय शिक्षणाची दुरावस्था झालेली आहे. शिक्षणाचा दर्जा दिवसेंदिवस ढासळत असल्याने चिंता व्यक्त केली जावू लागली. शिक्षण व्यवस्था सक्षम करण्यासाठी राज्य सरकारने पावले उचलण्यास सुरूवात केली. प्राथमिक व माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांचे आशयाधारीत मुल्यांकन करून त्यांच्यासाठी ऑनलाईन व मिश्र अभ्यासक्रम राबवला जाणार आहे.
शिक्षकांची गुणवत्ता सुधारली पाहिजे यासाठी राज्यात स्टार्स प्रकल्पाअंतर्गत 2022-23 मध्ये राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत प्राथमिक व माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांचे आशयाधारीत मुल्यांकन केले जाणार आहे. त्या माध्यमातून प्राथमिक व माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकासाठी गरजाधिष्टीत ऑनलाईन व मिश्र अभ्यासक्रम केली जात आहे. महाराष्ट्र शिक्षक पात्रता टीईटी परिक्षेत मागील नऊ वर्षात भावी शिक्षक उमेदवार उत्तीर्ण होण्याची संख्या चार टक्याच्या वर पोहोचू शकली नाही. नुकत्याच जाहिर झालेल्या टीईटी परिक्षेत गणित आणि विज्ञान विषयाच्या प्रश्न पत्रिकेमध्ये केवळ 1.45 टक्के उमेदवार उत्तीर्ण झाले असल्याने शिक्षकांच्या गुणवत्तेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे सध्या कार्यरत असलेल्या शिक्षकांची गुणवत्ता सुधारण्यासाठी शिक्षण विभागाने पावले उचलण्यास सुरूवात केली. त्याच अनुषंगाने राज्यात निपून महाराष्ट्र हा प्रकल्प देखील राबवले जात आहेत. दरम्यान ग्रामीण भागामध्ये शिक्षण व्यवस्थेची अत्यंत दयनिय अवस्था आहे. शिक्षणाचा दर्जा खालवत असल्याने चिंता व्यक्त केली जावू लागली. राज्यात 1,09,605 शाळा असून 2 कोटी 25 लाख 86 हजार 695 विद्यार्थी संख्या आहे. या विद्यार्थ्यांना 7,48,589 शिक्षक शिकवतात. दरम्यान राज्य सरकार आणि केंद्र सरकार शिक्षणासठी विविध योजना राबवत असल्या तरी त्या योजना जिल्हा पातळीवर योग्य पध्दतीने राबवल्या जात नसल्यामुळेच शिक्षण व्यवस्थेत कमकुवतपणा येत असल्याचे दिसून येवू लागले.