गोंदीतून साखळी उपोषणास सुरुवात, हिंगण गावात मराठे एकवटले, गोदाकाठी एक-एक गावात रोज होणार बेमुदत साखळी उपोषण
गेवराई (रिपोर्टर) मराठा आरक्षणाचा विषय न्याय दरबारी पडून असतानाच स्थानिक पातळीवर मराठा समाज पुन्हा आंदोलनाच्या पावित्र्यात दिसून येत असून गेल्या तीन दिवसांपासून गोदाकाठच्या गावांमध्ये साखळी उपोषणाला सुरुवात झाली आहे. गोंदी या ठिकाणी मराठा समाजाच्या तरुणांनी सर्वप्रथम साखळी उपोषणाला सुरुवात केचली. काल-परवा गेवराई तालुक्यातल्या हिंगण गावात उपोषण झाले. गोदाकाठी एक-एक गावात उपोषणाला सुरुवात झाली असून हे आंदोलन आता राज्यभर उभे राहणार असल्याचे सांगण्यात येते.
मराठा समाजाला न्यायालयाने आरक्षण नाकारलं. या प्रकरणात पुन्हा सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागण्यात आली. राज्य आणि केेंद्र सरकारकडेही मराठा आरक्षणाबाबत सातत्याने मागणी होत आहे. राज्यभरात मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून लाख-लाख-दोन-दोन लाखांचे मोर्चे निघाले. अखंड मराठा समाज आरक्षणासाठी एकवटला, परंतु आजपावेत मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही. आता पुन्हा एकदा गोदाकाठच्या मराठ्यांनी एका-एका गावामध्ये साखळी उपोषण करण्याचा निर्णय घेतला. सर्वप्रथम गोंदी येथील नागरिकांनी साखळी उपोषणाची सुरुवात करून तिथून आता हे उपोषणाचे लोण गोदाकाठच्या गावागावांमध्ये हळूहळू पोहचत असून गेवराई तालुक्यातील हिंगण गावात तरुणांनी बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे. साखळी उपोषणाच्या माध्यमातून गावागावांमध्ये मराठा समाज आपल्या आरक्षणाच्या मागणीवर ठाम असल्याचे पुन्हा एकदा निदर्शनास येत आहे.