बीड (रिपोर्टर) महावितरणकडून वीज ग्राहकांना दिले जाणारे वीज बील अव्वाचे सव्वा देण्यात येत असल्याने नागरिकांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. वीज बील कमी करून घेण्यासाठी कार्यालयात अनेक चकरा माराव्या लागत असून वीज वितरण कंपनीचे अधिकारी ग्राहकांना प्रतिसाद देत नसल्याच्या तक्रारी वाढल्या असल्याने महावितरणची कार्यपद्धत सुधरावी यासाठी जिल्हाधिकार्यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
वीज ग्राहक कमल शिंदे यांना तब्बल 52 हजार 630 रुपयांचे बील वीज वितरण कंपनीने दिले. त्यांचे बील कुठलेही थकित नव्हते. विजेचा वापरही केला नाही, मात्र अशा स्थितीतही कंपनीने ग्राहकाला अव्वाचे सव्वा बील दिले जाते. शिंदे यांच्या घरातील आप्तांनी सदरचं बील कमी करण्यासाठी वीज वितरणकडे धाव घेतली त्या वेळी त्यांना या कार्यालयातून त्या कार्यालयामध्ये पाठविण्यात येऊ लागलं. ज्या ठिकाणी वीज बील कमी करण्यात येते, त्या ठिकाणचे अधिकारी, कर्मचारी उपलब्ध नसल्याचा अनुभव शिंदे कुटुंबीयांना आला. एकीकडे ग्राहक नित्य नियमाने बील भरत असताना वीज कंपनीकडून मात्र ग्राहकांना सातत्याने ज्यादा बील देऊन मानसिक त्रास दिला जात असल्णयाने या प्रकरणाची गंभीर दखल जिल्हाधिकार्यांनी घ्यावी आणि वीज वितरण कंपनीचा भोंगळ कारभार थांबवावा, अशी मागणी ग्राहकांकडून होत आहे.