बीड (रिपोर्टर) बीडच्या आरटीओ कार्यालयात सातत्याने होत असलेल्या मनमानी कारभाराच्या विरोधात सातत्याने ओरड असताना आता थेट आरटीओ ऑफीसचे अधिकारी विघ्ने यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांची चौकशी करण्याची मागणी वाहन खरेदी-विक्री करणार्या व्यापारी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकार्यांकडे करण्यात आली असून या तक्रारीची गंभीर दखल जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी घ्यावी, अशी मागणी के.के. वडमारे यांनी केली आहे.
बीडच्या आरटीओ कार्यालयामध्ये होत असलेला मनमानी आणि अनागोंदी कारभार सातत्याने समाजासमोर आणि प्रशासनासमोर मांडण्यात आला आहे. पैसे दिल्यानंतर या कार्यालयात तात्काळ काम होते, मात्र पैसे न दिल्यास याठिकाणी कुठलेही काम होत नसल्याची प्रमुख तक्रार आहे. सातत्याने या कार्यालयातला भ्रष्टाचार समोर येत आहे. अधिकारी गैरहजर असतात, या प्रकरणी अनेक वेळा तक्रारी दिल्यानंतरही प्रशासन याकडे लक्ष देत नाही. कधी नेट बंद, कधी लाईट नाही, कधी अधिकारी सुट्टीवर आहेत, असे एक ना अनेक कारणे येथील कामचुकार अधिकार्यांकडून दिले जातात. या सर्व कारभाराला आरटीओ विघ्ने हे दोषी असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करून चौकशी करण्याची मागणी एका निवेदनाद्वारे वाहन खरेदी-विक्री करणार्या व्यापारी संघटनेने जिल्हाधिकार्यांकडे केली आहे. सदरच्या मागणीची गंभीर दखल जिल्हाधिकार्यांनी घ्यावी व दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी के.के. वडमारे यांनी केली असून आरटीओ कार्यालयातील कारभार वेळीच सुधारला नाही तर औरंगाबाद येथील आयुक्त कार्यालयासमोर बीडच्या आरटीओ कार्यालयातील भ्रष्टाचारी कारभाराविरोधात फलक लावले जातील, असा इशाराही राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सचिव के.के. वडमारे यांनी दिला आहे.