बीड (रिपोर्टर) केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने शहरासह गावपातळीवर अनेक योजना राबविल्या जातात, मात्र या योजना वेळेवर पुर्ण केल्या जात नाहीत. ग्रामीण भागात स्वच्छ भारत मिशन योजना सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत घनकचर्याची कामे मंजूर करण्यात आली. बीड जिल्ह्यात 582 चे टार्गेट असून त्यापैकी 216 कामे अर्धवट आहेत. फक्त 43 कामेच पुर्ण झाली आहेत. मंजूर सर्व कामे कधी पुर्ण होतील? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून स्वच्छतेवर भर दिला जातो. दरवर्षी केंद्र आणि राज्य सरकार कोट्यवधी रुपयांचा खर्च करत आहे. स्वच्छालय बांधण्यापासून ते घनकचर्याची विल्हेवाट लावण्यापर्यंतच्या योजना राबविल्या जातात, अनेक ग्रामपंचायती योजनेबाबत उदासीन भूमिका घेत असल्यामुळे वेळेमध्ये योजना पूर्ण होत नाहीत. बीड जिल्ह्यात घनकचर्याची 582 कामे मंजूर करण्यात आलेली होती. त्णयापैकी 216 कामे अर्धवट स्थितीत आहेत. वर्षाअखेर फक्त 43 कामेच पुर्ण झाली. मंजूर सर्व कामे कधी पुर्ण होणार? याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
अनेक ठिकाणी घनकचर्याची कामे बोगस
कुठलीही योजना राबवित असताना त्याच्यामध्ये पारदर्शकता असणे गरजेचे आहे. पारदर्शकतेमुळे गावच्या विकासात भर पडत असते. अनेक गावपुढारी आणि सरपंच योजना गिळण्याचाच प्रयत्न करतात. कुठल्या योजनेतून किती पैसे राहतील याकडे गुत्तेदाराचे लक्ष असते. घनकचर्याची बहुतांश कामे बोगस दाखविली जातात. बोगस कामे होऊ नये यासाठी पंचायत समितीसह जिल्हा परिषदेच्या अधिकार्यांनी लक्ष घालायला हवे. ज्या ठिकाणी बोगस कामे होतील त्या ठिकाणची बिले रोखायला हवीत.