नागपूर (रिपोर्टर) गढी गावासह जिल्ह्यात झालेल्या 2013-14 च्या पाणीपुरवठा योजनेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा मुद्दा उचलत गढी येथील पाणीपुरवठा योजनेचे पाणी हे कारखान्याला जाते, असे म्हणत आ. लक्ष्मण पवार यांनी या प्रकरणी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करत याची उच्चस्तरीय समितीकडून चौकशी करून अहवाल सादर करण्याची मागणी केली.
2013-14 साली भारत निर्माण कार्यक्रमांतर्गत गढी येथे कोट्यवधी रुपयांची पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली. त्यानंतर या भागात हायवेचे काम झाल्यामुळे या योजनेवर पुन्हा 2022 साली 1 कोटीपेक्षा जास्त रुपये खर्च करण्यात आले. वास्तविक पाहता सदरची योजना ही योग्य पद्धतीने राबविण्यात आलेली नाही. या योजनेतून येणारे बहुतांशी पाणी हे गढी येथील कारखान्याला जात असल्याचा उल्लेख आ. लक्ष्मण पवार यांनी विधानसभेत केला. याचबरोबर जिल्ह्यात जलजीवन मिशन योजनेअंतर्गत जे काम होत आहेत अन् त्या कामासाठी जे लोक टेंडर भरत आहेत तिथेही अनागोंदी कारभार सुरू आहे. या प्रकरणी उच्चस्तरीय समितीकडून चौकशी करून अहवाल सादर करण्याची मागणी आ. लक्ष्मण पवार यांनी आज विधानसभेत केली.