उद्याच्या व्यसनमुक्त कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री, ग्रामविकासमंत्री, पालकमंत्र्यांची उपस्थिती
बीड (रिपोर्टर) शिवसंग्रमचे संस्थापक अध्यक्ष स्व. विनायक मेटे यांनी व्यसनमुक्तीसाठी मोहीम उघडली होती. प्रत्येक वर्षाच्या पहिल्या दिवशी शहरातून भव्य रॅली काढून व्यसनमुक्तीचे संदेश दिले जायचे. यावर्षी कै. अण्णासाहेब पाटील प्रतिष्ठारकडून व्यसनमुक्तीचा कार्यक्रम घेण्यात येणार असल्याची माहिती देत उद्याच्या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार असल्याचे ज्योतीताई मेटे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
शिवसंग्राम भवन याठिकाणी ज्योतीताई मेटे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेला प्रभाकर कोलंगडे, नारायण काशीद, सुहास पाटील, अनिल घुमरे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी बोलताना ज्योतीताई मेटे म्हणाल्या की, शिवसंग्रमचे संस्थापक अध्यक्ष स्व. विनायक मेटे हे दरवर्षी व्यसनमुक्तीचा कार्यक्रम घ्यायचे. आजच्या तरुण पिढीला व्यसनातून मुक्त करण्याचा विडा त्यांनी उचललेला होता. सातत्याने ते तरुणांच्या आरोग्यासह भविष्याचा विचार करायचे, त्यासाठी ते लढायचेही. या वर्षीही स्व. मेटे आपल्यात नाहीत. परंतु त्यांचे विचार, त्यांची शिकवण आपण सर्वांमध्ये आहे. त्यामुळेच कै. अण्णासाहेब पाटील प्रतिष्ठाणकडून यावर्षीही व्यसनमुक्तीचा कार्यक्रम घेण्यात येणार असून 31 डिसेंबर रोजी शहरातून भव्य रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीला संबोधित करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकासमंत्री गिरीष महाजन, बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे हे उपस्थित राहणार असून सदरच्या कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन या वेळी ज्योतीताई मेटे यांनी केले.