पुणे (रिपोर्टर) पिंपरी चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप (वय 59) यांचं दीर्घ आजाराने आज सकाळी निधन झालं. काँग्रेसमधून आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात करणार्या लक्ष्मण जगताप यांनी पुढे राष्ट्रवादी आणि नंतर भाजपमध्ये प्रवेश करत शहरातील राजकारणात आपलं स्थान भक्कम केलं. कर्करोगाशी झुंज देत असतानाही आमदार जगताप हे काही महिन्यांपूर्वी झालेल्या राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीत मतदान करण्यासाठी मुंबईत पोहोचल्याने त्यांच्या पक्षनिष्ठेची राज्यभरात मोठी चर्चा झाली होती.
आमदार लक्ष्मण जगताप हे कधीकाळी राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे सर्वांत जवळचे सहकारी म्हणून परिचित होते. 1999 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्याअगोदर 1993- 94 मध्ये महापालिकेचे स्थायी समिती सभापती म्हणून त्यांनी काम पाहिले होते. लक्ष्मण जगताप यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात ही काँग्रेस पक्षातून झाली. 1992 चा निवडणुकीत ते नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यानंतर सलग 10 वर्ष त्यांनी पिंपळे गुरव येथील प्रतिनिधीत्व केले. याशिवाय 19 डिसेंबर 2000 ते 13 मार्च 2002 या काळात पिंपरी चिंचवडचं महापौरपदही त्यांनी भूषवलं होतं.