बीड (रिपोर्टर) बीड जिल्ह्यात 11 जानेवारी ते 17 जानेवारी दरम्यान रस्ता सुरक्षा सप्ताह आयोजीत करण्यात आला आहे. प्रशासनाकडून जनजागृती होत असली तरीही जिल्ह्यात अपघातांची मालिका सुरुच आहे.
जिल्ह्यात चार अपघात झाले असून चौघांचा बळी गेला आहे. यामध्ये गेवराईत कार कंटेनरच्या भीषण अपघातात माजलगाव येथील भाजपाचे नेते मोहनराव जगताप यांचे पुतणे विश्वजीत जीवनराव जगताप यांचा काल रात्री अपघाती मृत्यू झाला. अंबाजोगाई येथे कृषी विज्ञान केंद्राजवळ एसटी बसच्या धडकेत मोटारसायकलस्वार जागीच ठार झाल्याची घटना 13 जानेवारी रोजी घडली. त्याच दिवशी परळी तालुक्यात परळी-गंगाखेड रस्त्यावरील दादाहरी वडगाव रस्त्यावर कार-जीपचा भीषण अपघात झाला होता. यामध्ये एक जण जागीच ठार तर 12 जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. 13 जानेवारी रोजी धारूर तालुक्यातील गावंदरा रस्त्यावर बस-दुचाकीची धडक होऊन पोलीस पाटील आबासाहेब राघू बडे (वय 55) यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्याच बसने पुढे दुसर्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये रामेश्वर बडे, समाधान दत्तू बडे हे जखमी झाले. जिल्ह्यात रस्ता सुरक्षा सप्ताह सुरू असताना दुसरीकडे अपघाताची मालिकाही सुरू आहे.