पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह भीमा नदीत फेकले
बीड/पुणे (रिपोर्टर) पुणे जिल्ह्यात दौंड परिसरात पारगाव येथील भीमा नदीत काल मंगळवारी 7 जणांचा मृतदेह आढळला होता. मुलाने पळून जाऊन लग्न केल्याने संबंधित कुटुंबाने आत्महत्या केल्याचे सुरुवातीला सांगितले जात होते. मात्र पोलिसांच्या तपासात या आत्महत्या प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाले आहे. 3 चिमुरड्यासह 7 जणांचा खून झाल्याचे उघडकीस आले आहे.
चार चुलत भावांनीच कुटुंब प्रमुखासह सात जणांची हत्या केल्याचे समोर आले आहे. मृत मोहन पवार यांचे आरोपी हे सख्खे चुलत भाऊ आहेत. पवार कुटुंबीयांनीच आपल्या मुलाचा अपघात करुन त्याचा खून केल्याचा संशय एका चुलत भावाला होता. त्यातून त्याने इतर तीन भावांसह पवार कुटुंबातील 7 जणांची हत्या केली व नंतर त्यांचे मृतदेह भीमा नदीत फेकल्याचे तपासात समोर आले आहे.
याप्रकरणी पोलिसांनी अशोक कल्याण पवार (वय 40), श्याम कल्याण पवार (वय 30 ), प्रकाश कल्याण पवार (वय 32) आणि आणखी एक त्यांचा भाऊ अशा चौघांना ताब्यात घेतले आहे. मृतक मोहन पवार यांचे आरोपी हे सख्खे चुलत भाऊ आहेत. मोहन पवार यांच्या मुलासोबत
आरोपींचा एक मुलगा दुचाकीवर काही दिवसांपूर्वी गेला असताना त्याचा अपघात झाला होता. या घटनेत सदर मुलगा गंभीर जखमी होऊन त्याच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत होते. मात्र, चार दिवस ही बाब पवार कुटुंबाने मुलाच्या पालकांना सांगितले नव्हती. या घटनेत दुर्दैवाने मुलाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तेव्हा आपल्या मुलाचा खून हा पवार कुटुंबीयांनी केल्याचा संशय चुलत भावांना होता. या रागातून त्यांनी पवार कुटुंबीयांच्या खुनाचा कट रचला.
घटनेच्या दिवशी आरोपींनी चुलत भाऊ मोहन पवार व त्याच्या कुटुंबीयांना गावाला जाऊ, असे सांगितले आणि गाडीत बसवले. त्यानंतर ते भीमा नदी पात्राच्या जवळ गेले. तेथे आरोपींनी 7 जणांना मारून त्यांचे मृतदेह भीमा नदी पात्रात फेकून दिले आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. आरोपींनी नेमके कशाप्रकारे मयतांना मारले, त्यांच्या खुनामागे नेमके अजून कोणते इतर कारण आहे का?, याबाबत पुणे ग्रामीण पोलिस यांची स्थानिक गुन्हे शाखा तपास करत आहे.
सुरुवातीला आत्महत्येचा अंदाज
मोहन पवार यांचा छोटा मुलगा अनिल पवार (वय 20) हा त्यांच्याच समाजातील महिलेसह 17 जानेवारी रोजी लग्नाकरिता पळून गेला होता. त्यानंतर हे भयानक हत्याकांड घडले. त्यामुळे सुरुवातीला पवार कुुटुंबातील 7 जणांनी बदनामीच्या भीतीने आत्महत्या केली असावी, असा अंदाज वर्तवला जात होता (वाचा सविस्तर). मात्र, पोलिसांनी केलेल्या सखोल तपासात मोहन पवार यांच्या चुलत भावांनीच हे हत्याकांड केल्याचे उघड झाले आहे.
भीमा नदीच यांचे मृतदेह आढळले
मोहन उत्तम पवार (वय 50), संगीता मोहन पवार (वय 45), त्यांचा जावई शामराव पंडित फुलवरे (वय 32), पत्नी राणी शामराव फुलवरे (वय 27), त्यांचा मुलगा रितेश शामरावर फुलवरे (वय 7), छोटू शामराव फुलवरे (वय 5) व कृष्णा फुलवरे (वय 3), यांचे मृतदेह मंगळवारी भीमा नदीत आढळली होती. याबाबत यवत पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मोहन पवार हे मुळचे बीड जिल्हयातील गेवराई परिसरातील रहिवासी असून एक वर्षापूर्वी कुटुंबासह दौंड परिसरातील पारगाव येथे राहण्यास आले होते. शेतमजुरी, माती खोदकाम, उसतोडणी अशी कामे ते करत होते. तर, त्यांचे जावई शामराव फुलवरे हे आपल्या कुटुंबासह उस्मानाबाद, वाशी येथे राहत होते.