प्रचार अंतिम टप्प्यात; भेटीगाठी, प्रचारसभांमधील गर्दी वाढली
बीड (रिपोर्टर) सहा जिल्ह्यात विस्तारलेल्या मराठवाडा शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. गेली तीन टर्म या मतदारसंघाचे नेतृत्व करताना आ. विक्रम काळे यांनी केलेल्या कामाची पावती म्हणून या वेळेसही शिक्षक मतदार विक्रम काळेंच्या पाठिशी खंबीरपणे उभे असल्याचे चित्र बीड जिल्ह्यासह अन्य पाच जिल्ह्यात पहावयास मिळत असून प्रतिस्पर्धी उमेदवारांची या निवडणुकीत चितपट होणार अन् विक्रम काळे हे निवडून येत विजयी चौकार मारणार, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
मराठवाडा शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लागली. या निवडणुकीमध्ये आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम काळे हे निवडणूक रिंगणात उतरले. त्यांना आव्हान देण्याहेतू भाजपाचे उमेदवार निवडणूक रिंगणात आले खरे मात्र आजपर्यंतचा म्हणण्यापेक्षा गेल्या पंचेवीस वर्षाचा या मतदारसंघाचा इतिहास पाहता या मतदारसंघावर काळे यांचा दबदबा असल्याचे दिसून येते. गेली तीन टर्म आमदार विक्रम काळे 25 हजाराच्या पहिल्या पसंतीच्या मतात निवडून आलेले आहेत. यावर्षी भाजपाच्या उमेदवारासह अन्य अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात असले तरी मराठवाड्यातील बीड आणि अन्य पाच जिल्ह्यातून शिक्षक मतदार विक्रम काळेंना पहिली पसंत देत आहेत. त्यांच्या विविध कॉर्नर बैठका आणि सभांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना आजपर्यंत पहावयास मिळाले असून प्रचार अंतिम टप्प्यात येऊन पोहचला आहे. या वेळेसही विक्रम काळे हे विजयी चौकार मारणार असल्याचे थेट मतदारांचेच म्हणणे आहे. गेल्या पंधरा वर्षांत काळे यांनी शिक्षकांचे नेतृत्व करताना त्यांचे अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. त्यांच्या कर्तव्य-कर्माची पावती शिक्षक मतदार या निवडणुकीत त्यांना विजयी करून देणार असल्याची प्रतिक्रिया जिल्ह्या जिल्ह्यातील शिक्षकांनी व्यक्त केली आहे.