बीड (रिपोर्टर) महाराष्ट्रात बंदी असलेला गुटखा बीडमध्ये मोठ्या प्रमाणात विक्री केला जात आहे. नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोरगाव आणि ससेवाडी येथे गुटखा विक्री होत असल्याची माहिती मिळताच नेकनूर पोलीस ठाण्याचे ठाणेप्रमुख विलास हजारे यांनी आपल्या पथकासह तेथे धाड मारली असता तीन गुटखा माफियांसह 1 लाख 27 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई 30 जानेवारी रोजी करण्यात आली.
नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोरगाव फाटा व ससेवाडी येथे दोघे जण दुचाकीवरून गुटखा विक्रीसाठी घेऊन आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून नेकनूर पोलीस ठाण्याचे प्रमुख विलास हजारे, खांडेकरसह आदींनी मोरगाव येथे छापा मारला असता त्याठिकाणी अनिल नारायण शिंंदे, शैलेश नारायण शिंदे (दोघे रा. लिंबागणेश), भाऊसाहेब राजाराम उंबरे (रा. ससेवाडी) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 1 लाख 27 हजार 142 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्यांची पोलिसांनी कसून चौकशी करत हा गुटखा कोठून आणला? याबाबत विचारपूस केली असता आकिब शकील बागवान (रा. जामखेड) व पवन ठोंबरे (रा. बीड) यांची नावे सांगितल्यावरून वरील पाच जणांवर नेकनूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.