प्रखर- नवी आघाडी
घडणार की, बिघडणार?
राजकारणात कुणी कोणाचा कायमचा शुत्र नसतो. सोयीनूसार कधीही कोणाची युती, आघाडी होवू शकते. पंचवीस वर्ष भाजपासोबत शिवसेनेचा संसार चालला. ही पंचवीस वर्षाची युती गेल्या निवडणुकीत तुटली. भाजपा, शिवसेनेत इतकं वितुष्ट आलं की, भाजपाने शिवसेनेला संपवण्याचा जोरदार प्रयत्न केला. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीची सत्ता पलटून टाकली. तीन पक्षाचं सरकार गेलं, दोघाचं सरकार आलं. येणार्या निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस या तिन्ही पक्षाची आघाडी कायम राहील की नाही हे आज सांगता येत नाही. कारण तिन्ही पक्षाच्या नेत्यांचे वेगवेगळे वक्तव्य येत असतात. तिन्ही पक्ष स्थानिकच्या निवडणुका वेगळ्या लढू शकतात? सत्तांतरामुळे कमकुवत झाली ती शिवसेना, या पक्षाला आपलं अस्तित्व टिकण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागणार. नेते, कार्यकर्ते जोडण्यासाठी प्रयत्न करावे लागणार. नव्या छोटया, मोठया पक्षांना सोबत घ्यावे लागणार. शिवसेनेची मुबंईसह ग्रामीण भागात चांगली ताकद आहे. ही ताकद कमी करण्याचा प्रयत्न होत आहे. जे शिवसेने सोबत जातात त्यांना वेगवेगळ्या अडचणी आणल्या जात आहेत. एकीकडून मुख्यमंत्री शिदे, दुसरीकडून उपमुख्यमंत्री फडणवीस हे ठाकरे यांची कोंडी करत आहेत. ही कोंडी फोडून ठाकरे यांना आपला पक्ष बळकट करायचा आहे. पुर्ण पक्षच हायजॅक करण्याचा प्रयत्न भाजपासह मुख्यमंत्री शिंदे यांनी केला. त्यांच्या या प्रयत्नाला किती यश येतेय? की त्यांच्या तगड्या त्यांच्या गळ्यात पडतात हे येत्या काळात नक्कीच दिसेल!
वंचीतचा वाढता जोर
बहुजन वंचीत आघाडी ही गत निवडणुकीपासून चर्चेत आली. यापुर्वी प्रकाश आंबेडकर यांनी बरेच प्रयोग करुन पाहितले होते. त्यांचे प्रयोग तितके यशस्वी ठरले नाहीत. सर्व जाती, धर्माच्या लोकांना सोबत घेवून त्यांनी आता नवी मोट बांधली. 2019 च्या निवडणुकीत त्यांनी अगदी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली होती, ज्या छोटया जात समुहांना कधीच उमेदवारी मिळाली नाही, अशांना त्यांनी तिकीट दिले होते. बर्याच उमेदवारांना चांगले मते पडली होती. काही उमेदवारामुळे राष्ट्रवादी, काँग्रेसच्या उमेदवारांना फटका सुध्दा बसलेला आहे. सगळ्यात जास्त नुकसान दोन्ही काँग्रेसचं वंचीतमुळे झालेलं आहे. त्यामुळे वंचीत सोबत जुळवून घ्यायचं की नाही याचा निर्णय या दोन्ही पक्षांवर अवलंबून आहे. काँग्रेस पक्षातून बरेच नेते बाहेर पडले. येत्या निवडणुकीपर्यंत आणखी किती नेते बाहेर जातात हे नक्कीच सांगता येत नाही? वंचीत सोबत काँग्रेसची गेल्या निवडणुकीच्या वेळी चर्चा झाली होती. वंचीतने आता पर्यंत काँग्रेस हारलेल्या जागा मागत होती, पण काँग्रेसला ते मान्य झालं नाही. त्यामुळे त्यांची बोलणी फिस्कटली. शेवटी जे व्हायचं तेच झालं. काँग्रेसचा लोकसभेत फक्त एकच उमेदवार निवडून आला होता. विधानसभेत 44 आमदार कसे, बसे निवडून आले होते, ते ही राष्ट्रवादी सोबत होती म्हणुन, नाही तर बुड बसलं असतं. येत्या निवडणुकीत काँग्रेसला कोणाचा ना कोणाचा हात पकडावा लागणार आहे. नाही तर कॉग्रंेसच्या हातात शिल्लक काही राहिल असं वाटत नाही?
नाही जमलं !
वंचीतने पहिल्यांदा एमआयएम सोबत आघाडी केली. वंचीत एमआयएम सोबत कशी काय असे अनेक प्रश्न उपस्थित केले गेले. राजकारणात काहीही होवू शकतं. त्याप्रमाणे दोन्ही पक्षांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रीत लढवल्या. यात औरंगाबादची लोकसभेची एकच जागा एमआयएमला मिळाली. वंचीतला एक ही जागा मिळाली नाही. मतं चांगली पडली पण निवडुन एक ही जागा आली नाही. काही ठिकाणी दोन्ही पक्षातील मताबाबत वाद, विवाद निर्माण झाले. जे मते वंचीतला पडायचे होते, ते बर्याच ठिकाणी एमआयएमचे पडले नाही. त्यामुळे दोन्ही पक्षात फाटाफुट झाली. दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. वंचीत हा चांगला पर्याय उभा राहू शकतो हे आता जवळपास निश्चीत झालं आहे. वंचीतने काही होणार नाही असं जे लोक म्हणत होतं. त्यांना बरीच चपराक वंचीतच्या मिळालेल्या मतामुळे बसली आहे. प्रकाश आंबेडकर यांना मानणारा वर्ग राज्यात मोठा आहे. इतर दलित नेत्यापेक्षा प्रकाश आंबेडकर यांच्या पाठीशी मतांचा जास्त गठ्ठा आहे. विशेष करुन आंबेडकर यांनी जी मोट बांधली त्यात सगळयाच जाती, धर्माचे ‘वंचीत’नेते, कार्यकर्ते आहेत. आता पर्यंत प्रस्थापीत राजकारण्यांनी दुसर्यांना संधी दिली नाही. त्यांच्या पुढील पिढ्या राजकारणात सक्रीय होतांना दिसून येवू लागल्या. ग्रामीण भागातील साधा कार्यकर्ता वंचीतशी जोडलेला आहे. शहरी भागात वंचीतने चांगले प्राबल्य निर्माण केलेले आहे. वेगवेगळ्या आंदोलनातून वंचीतने आपली ताकद दाखवलेली आहे. त्यामुळे इतर जे काही प्रमुख पक्ष आहेत, ते वंचीतला सोबत कसं घेता येईल याचा विचार करु लागले. काही प्रमुख पक्षाशी वंचीत सोबत वैचारीक वाद असले तरी वाद मिटवून आपण वंचीला सोबत घेतलं पाहिजे अशी अनेक पक्षातील कार्यकर्त्यांची अपेक्षा असते. एमआयएम हा कायम स्वरुपी चांगला चालणार पक्ष नाही. या पक्षाची तितकी हवा राहिली नाही. ठरावीक जात समुहापुरता हा पक्ष मर्यादीत राहत आलेला आहे. एका जाती, धर्माच्या राजकारणावर कधीच कोणता पक्ष मोठा होवू शकत नाही. जी हवा एमआयएमची पाच वर्षापुर्वी होती, ती आज दिसत नाही. येत्या निवडणुकीत बरचं वातावरण बदलेलं असेल.
शिवसेनेची गरज
जोही आपल्या सोबत येईल. त्याचं स्वागतच असं शिवसेनेच्या बाबतीत झालं. शिवसेनेला मुबंई महापालिका महत्वाची आहे. शिवसेनेच्या ताब्यातून मुंबई महापालिका काढून घेण्यासाठी भाजपाने जोरदार प्रयत्न सुरु केले. काही ही झालं तरी मुंबई आपली झाली पाहिजे ही भाजपाशी खेळी आहे. त्या दिशेने भाजपाने तयारी सुरु केली. मुंबईत मनसेची बर्याच ठिकाणी चांगली ताकद आहे. एखाद वेळेस मनसेला भाजपा सोबत घेवू शकतो. आता पर्यंत राज ठाकरे यांच्याशी भाजपाच्या नेत्यांनी अनेक वेळा बंद दाराआड चर्चा केलेल्या आहेत. मनसे, शिंदे सेना आणि भाजपा अशी युती होवू शकते? मध्यंतरी भाजपाने पंतप्रधान मोदी यांना मुंबईत आणलं होतं. मोदी यांना मुंबईत आणणं म्हणजे एक प्रकारे प्रचाराचा शुभारंभ करण्यासारखं आहे. मुबंईत काँग्रेस, राष्ट्रवादीची तितकी ताकद नाही. ज्या पक्षाची मुबंईत ताकद आहे. त्यांना सोबत घेणं हे शिवसेनेसाठी चांगलं ठरणारं आहे. मुंबईची निवडणुक पाहता शिवसेनेने वंचीतसोबत आघाडी केली. शिवशक्ती, भीमशक्ती एकत्रीत आली. मुंबईच्या अनेक प्रभागात वंचीतचा चांगला मतदार आहे. सोबत दोन्ही कॉग्रंेसने शिवसेनेला साथ दिली तर नक्कीच बराच फरक पडू शकतो, हाच विचार शिवसेनेचा असावा म्हणुन शिवसेनेने वंचीत सोबत जुळवून घेतलं आणि आघाडी करण्याचा निर्णय घेतला. वंचीत निवडणुकीत भाजपाला जशाच तसं उत्तर ही देवू शकतो. अॅड. प्रकाश आंबेडकर हे चांगले वक्ते आहेत. विशेष करुन त्यांचा अभ्यास चांगला आहे. त्यामुळे दोन्ही पक्षाला चांगलाच फायदा होवू शकतो. वंचीतने आपल्या सोबत यावं असं मुख्यमंत्री शिंदे यांना वाटत होतं. शिंदे यांनी आंबेडकर यांची भेट सुध्दा घेतली होती, पण शिंदे हे आंबेडकर यांना योग्य वाटले नसतील? म्हणुन त्यांनी शिवसेनेसोबत जाणं पसंद केलं असावा!
पुढचा मार्ग कसा?
शिवसेनेने वंचीत सोबत आघाडी केल्याने दोन्ही काँग्रेसचं काय अशी ही चर्चा होेवू लागली. दोन्ही काँग्रेसला सोबत घ्यायचं की नाही हे शिवसेना, वंचीतवर अवलंबून आहे. राष्ट्रवादीमुळेच शिवसेनेचं नुकसान झालं असं शिवसेना सोडून गेलेल्या बर्याच आमदाराचं मत होतं. त्यामुळे आगामी काळात राष्ट्रवादी सोबत शिवसेना जाणार का? खा. संजय राऊत राष्ट्रवादीच्या बाबतीत सकारात्मक असतात. ज्या वेळी भाजपा, शिवसेना युती होती. त्यावेळी राऊत राष्ट्रवादीच्या विरोधात रकाने की, राकाने भरुन लिहत होते. विशेष करुन अजित पवारांच्या विरोधात त्यांचा जास्त रोष असायचा. जेव्हा पासून 2019 च्या निवडणुकीत परिवर्तन झालं. ठाकरे मुख्यंमत्री झाले. तेव्हा पासून खा. राऊत यांनी आपली लेखणी म्यान केली आणि राष्ट्रवादीच्या विरोधात बोलणं आणि लिहणं सुध्दा बंद केलं. शिवसेना, वंचीत यांचा संसार टिकणार का असं बोललं जावू लागलं. खा. राऊत यांनी आंबेडकरांच्या विरोधात एक वक्तव्य केलं. त्यामुळे दोन्ही पक्षातील वाद मिटणार की बिघडणार असं वाटू लागलं. आंबेडकर यांनी उध्दव ठाकरे यांच्याशी चर्चा करुन आघाडी केली. त्यामुळे खा. राऊत यांच्या बोलण्याला तितकं महत्व प्राप्त होईल असं वाटत नाही. स्थानिक संस्थाच्या निवडणुका रखडलेल्या आहेत. वर्ष झालं. प्रशासक लागू आहे. जो पर्यंत कोर्टाचा निकाल लागत नाही. तो पर्यंत निवडणुकीचा मार्ग निघणार नाही. येत्या दोन महिन्यात निवडणुका होतील. शिवसेनेचा विस्तार अगदी वाडी,वस्तीवर झालेला आहे. स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत शिवसेना, वंचीतला फायदा होवू शकतो. या दोन्ही पक्षाच्या आघाडीचा दोन्हीकडील कार्यकर्त्यांनी स्वागतच केलेलं आहे. राहिला प्रश्न दोन्ही काँग्रेसचा, राष्ट्रवादी ग्रामीण भागात पॉवरफुल आहे. काँग्रेसचा मतदार घटलेला आहे. चारही पक्ष लोकसभा, विधानसभा निवडणुकीत एकत्रीत आले तर नक्कीच हे भाजपा समोर मोठं आव्हान उभा राहू शकतं. शिवसेना, वंचीतचा नवा संसार कुठपर्यंत टिकेल हे येत्या काळात दिसून येईल.