मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊनही रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला नाही
तरुणाला खाली उतरवण्यासाठी पोलीस घटनास्थळी तळ ठोकून
बीड (रिपोर्टर)- सिमेंट रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्यात यावा, अशी मागणी आष्टी तालुक्यातील वाहिरा येथील तरुणाने सातत्याने केली मात्र या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याने आज सकाळी सदरील हा तरुण बीड शहरातील बालेपीर भागात असलेल्या एका मोबाईलच्या टॉवरवर चढून बसला. त्याच्या या आंदोलनाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. घटनेची माहिती पोलिस प्रशासनाला झाल्यानंतर पोलीस त्याठिकाणी तळ ठोकून होते. प्रशासनाने विनवण्या करूनही दुपारी एक वाजेपर्यंत तरुण खाली उतरलेला नव्हता. अग्निशामक दलही दाखल झाले होते. या तरुणाने मुख्यमंत्र्यांना देखील मुंबईत जावून निवेदन दिले होते,
मात्र तरीही त्याची दखल घेतली गेली नाही.
आष्टी तालुक्यातील वाहिरा येथील झांजेवस्ती, तरटे वस्ती, भवरवाडी या परिसरातील रस्ता अत्यंत खराब आहे. खराब रस्त्यामुळे एकदा शालेय विद्यार्थ्यांचा अपघातसुद्धा झाला होता. सदरील वस्त्यांवर सिमेंट रस्ता करावा, अशी मागणी अशोक शिवाजी माने (वय 35) हा तरुण सातत्याने करत होता. 28 जानेवारी रोजी आष्टी तहसील कार्यालयासमोर या तरुणाने आंदोलन केले होते. विशेष करून मुंबईत जाऊन मुख्यमंत्र्यांना त्याने निवेदन दिले होते. इतकं सगळं करूनही आपल्या मागण्यांकडे शासन-प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे पाहून सदरील तरुण आज सकाळी बीड शहरातील बालेपीर भागात असलेल्या मोबाईल टॉवरवर चढून बसला. शोले स्टाईल आंदोलन त्याने सुरू केले. घटनेची माहिती पोलीस प्रशासनाला झाल्यानंतर पोलिस त्या ठिकाणी दाखल झाले होते. अग्निशामक दलाला देखील पाचारण करण्यात आले होते. तरुण उंचस्थळी जावून बसल्याने प्रशासकीय अधिकार्यांना तिथपर्यंत पोहचण्यास अडचणी निर्माण होत होत्या. प्रशासन विनवण्या करूनही दुपारी एक वाजेपर्यंत तो खाली आलेला नव्हता. या अनोख्या आंदोलनामुळे पोलीस प्रशासनात चांगलीच खळबळ उडाली होती.