मुंबई (रिपोर्टर) राज्यातील प्रश्नांना न्याय देण्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशन किमान पाच आठवडे घ्यावे अशी मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. तसेच मराठवाडा मुक्ती संग्रामाचा अमृतमहोत्सव सर्वपक्षीयांच्या सहभागातून भव्य प्रमाणात साजरा करावा अशी मागणीही अजित पवार यांनी केली. आज विधानभवनात विधानसभा कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. यावेळी अजित पवारांनी अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची मागणी केली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या अधिवेशनात राज्यकर्त्यांनी पळवाट काढू नये असेही पवार म्हणाले.
नागपूरचे हिवाळी अधिवेशन किमान तीन आठवडे घेण्याची विरोधी पक्षांनी मागणी केली होती. मात्र, तरीही हिवाळी अधिवेशन तीन आठवडे घेण्यात आले नसल्याचे अजित पवार म्हणाले. त्यामुळं राज्यातील सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी सरकारनं अर्थसंकल्पीय अधिवेशन किमान पाच आठवड्याचे घेण्याची मागणी अजित पवार यांनी विधीमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत केली. या बैठकीला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, छगन भुजबळ, अशोक चव्हाण, जयंत पाटील, आशिष शेलार उपस्थित होते. मराठवाडा मुक्ती संग्रामाचा यंदा अमृतमहोत्सवी वर्ष आहे. हे वर्ष भव्य प्रमाणात साजरं व्हावं, अशी महाराष्ट्रवासियांची भावना आहे. त्यासाठी महाविकास आघाडी सरकारनं अर्थसंकल्पात 500 कोटींची घोषणा करण्यात आली होती. मराठवाडा, महाराष्ट्रातील नागरिकांना, सर्वपक्षीय नेत्यांना सोबत घेऊन मराठवाडा मुक्ती संग्रामाचं अमृतमहोत्सवी वर्ष साजरं करण्यात यावं, मराठवाडा मुक्तीचा संघर्ष नव्या पिढीपर्यंत घेऊन जावा, हा त्यामागचा प्रमुख उद्देश आहे. विधीमंडळ सदस्यांनी सभागृहात विविध आयुधांव्दारे उपस्थित केलेल्या प्रश्नांची योग्य, मुद्देसूद लेखी उत्तरे देण्यात यावीत, अशा मागण्या विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत केल्या. आता अजित पवार यांनी केलेल्या या मागण्यांवर सरकार काय निर्णय घेमार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
27 फेब्रुवारी ते 25 मार्च दरम्यान अर्थसंकल्पीय अधिवेशन
येत्या 27 फेब्रुवारीपासून विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. 25 मार्चपर्यंत हे अधिवेशन असणार आहे. 9 मार्चला अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस हे अर्थसंकल्प मांडणार आहेत. शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. त्यामुळं या नवीन अर्थसंकल्पात नेमक्या काय घोषणा होणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.