बीड (रिपोर्टर) कृष्णा खोर्याचं पाणी मराठवाड्याला आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. पंधरा वर्षात साडेतीन हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले. जेऊर ते नीरा भीमा जोड भोगद्याचे काम रखडले असून तसेच कालव्याचे बंधिस्त पाईपलाईनमध्ये रुपांतर करण्यात तांत्रिक अडचणी येऊ लागले, भू संपादनाचे कामही संथगतीने सुरू असून कृष्णेचे पाणी आष्टीमध्ये येण्यास आणखी पाच वर्षेतरी लागू शकतात, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
कृष्णा खोर्यातील मराठवाड्याचे क्षेत्र 8.39 टक्के आहे. उस्मानाबाद व बीड जिल्ह्याचा यात समावेश होतो. खोर्यातील 21 टीएमसी पाण्याचा मराठवाड्यात वापर करण्यास राज्य सरकारने 2001 या वर्षी परवानगी देण्यात आली. पहिल्या टप्प्यात 7 टीएसी पाणी आणण्याचे नियोजन करण्यात आले. त्यास प्रशासकीय मान्यता देण्यास 2007 हे वर्ष उजडले. तेव्हापासून सुरू असलेले हे काम अजूनही प्रलंबीतच आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात दोन तर बीड जिल्ह्यात आष्टी एक अशा तीन उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून कृष्णेचे पाणी मराठवाड्यात येणार आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील 26 हजार हेक्टर तर बीड जिल्ह्यातील 8 हजार हेक्टर असे 34 हजार हेक्टर ओलिताकाली येणार आहे. तिन्ही उपसा सिंचन योजनेच्या कामावर आतापर्यंत 2288 कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. आष्टी उपसा सिंचन योजनेच्या 1200 कोटी रुपयांच्या निविदेस राज्य सरकारने स्थगिती दिल्यानंतर अद्याप कामाला मुहूर्त लागलेला नाही.